मतदारसंख्येने सर्वात मोठा आणि आर्थिकदृष्ट्या सधन असलेल्या हिंजवडी गटात बहुरंगी चुरस; प्रमुख पक्षांसह अपक्षांचेही तगडे आव्हान. ZP Election 2026 – जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अखेरच्या दिवसापर्यंत जिल्हा परिषद गटासाठी २० तर पंचायत समितीच्या दोन्ही गणांसाठी २९ जणांनी उमेदवारी अर्ज भरले होते.भाजपा, राष्ट्रवादी, कॉंग्रेस, उद्धव सेना, आणि शिंदे शिवसेना यांनी सर्वच ठिकाणी आपले उमेदवार दिल्याने, प्रामुख्याने हिंजवडी गटात बहुरंगी चुरशीच्या लढत पाहायला मिळणार आहे. तर, राष्ट्रवादी (शरद पवार) यांनी केवळ पिरंगुट व पौड या दोन गटात तसेच काँग्रेसने देखील काही ठराविक जागांवर आपापले उमेदवार उभे केले आहे. अखेरच्या दिवसापर्यंत हिंजवडी माण जिल्हा परिषद गटासाठी २० तर, माण व हिंजवडी गणासाठी एकूण २९ इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मंगळवार (दि.२७) पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असणार आहे. विशेष म्हणजे, सोळा तारखे पासून उमेदवारी अर्ज दाखल करणं सुरु झाले होते. मात्र, पौष महिना असल्याने सर्व इच्छुकांनी उमेदवारी अर्ज नेले होते पण, बहुतांश इच्छुकांनी अर्ज दाखल केले नव्हते. त्यामुळे, अखेरच्या दोन दिवसात पौड पंचायत समिती आवारात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. Pune ZP Election दरम्यान, मुळशी तालुक्यात तीन जिल्हा परिषद गट आणि सहा पंचायत समिती गणांसाठी निवडणुका होणार आहेत. सर्वच ठिकाणी संभाव्य इच्छुकांनी मागील दोन महिन्यांपासून विविध कार्यक्रम घेत अप्रत्यक्ष प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. प्रामुख्याने माण- हिंजवडी गट हा मतदार संख्येने सर्वात मोठा गट आहे. आर्थिक दृष्टीने सधन असल्याने, गट आणि गणांसाठी इच्छुकांची संख्या देखील या गटात अधिक होती. मात्र, सर्वच प्रमुख पक्षांनी बंडाखोरीला बगल देत सक्षम उमेदवार देण्याचा प्रयत्न केला आहे. तर, अपक्ष म्हणून सुद्धा अनेक दिग्गजांनी आपले उमेदवारी अर्ज भरले आहेत. भाजपाच्या माण गणात दोन महिलांना पक्षाचे एबी फॉर्म मिळाल्याने बराच काळ तणावाचे वातावरण होते. त्यामुळे नेमका कुणाचा अर्ज ग्राह्य धरला जाणार याकडे राजकिय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. आता २७ तारखे पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. तो पर्यंत पडद्या मागे नक्की काय हालचाली होतात आणि यातील किती जण आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार याकडे मुळशी करांचे लक्ष लागले आहे.