प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याची आज शुक्रवारी (दि. २) शेवटची मुदत आहे. त्यापूर्वी शहरातील एका प्रमुख पक्षाकडून प्रतिस्पर्धी असलेल्या पॅनलमधील उमेदवारांना फोडण्यासाठी घोडेबाजार जोरात सुरू झाला आहे. उमेदवारांना कोट्यवधी रुपयांचे आमिष देत माघार घेण्यास सांगितले जात आहे. त्यासाठी मध्यरात्री बैठका होत असून राजकीय पदाधिकाऱ्यांचा रात्रीस खेळ सुरू झाला आहे. यामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या सुसंस्कृत राजकारणामध्ये सुरू झालेल्या घोडेबाजाराची जोरदार चर्चा रंगली आहे.दोन दिवसांपूर्वी महापालिका निवडणुकीसाठी शहरातील प्रमुख पक्षांसह अनेक अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. अर्ज दाखल करतेवेळी एबी फॉर्मच्या गोंधळामुळे अनेकांनी अपक्ष अर्ज दाखल केले आहेत. आता अर्ज माघारी घेण्यासाठी शेवटचा एक दिवस बाकी राहिला आहे. त्यापूर्वीच गेल्या दोन दिवसांपासून प्रमुख पक्षातील अनेक नेत्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या भेटी घेण्यास सुरूवात केली आहे. एका प्रमुख पक्षाच्या मोशी भागातील उमेदवाराला तब्बल नऊ कोटी रुपयांची ऑफर दिली आहे. चऱ्होलीकडे देखील ४ कोटी रुपयांचा भाव फुटला असून अर्ज माघारी घेतल्यानंतर घरपोहच रक्कम पाठवणार असल्याचे आश्वासन दिले जात आहे. शहरामध्ये तब्बल नऊ वर्षांनंतर निवडणूक होत आहे. २०१७ साली झालेल्या निवडणुकीनंतर गेल्या नऊ वर्षांत अनेक राजकीय समीकरणे बदलली आहेत. युत्या आणि आघाड्यांच्या खेळामध्ये अनेक इच्छुकांचे पत्ते कट झाले आहेत.त्यामुळे अपक्षांनी देखील मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल केले आहेत. अपक्षांनी माघार घ्यावी यासाठी त्यांच्या विनवण्या सुरू आहेत.तर दुसरीकडे प्रतिस्पर्धी असलेल्या प्रमुख पक्षांच्या उमेदवारांना देखील फोडण्याचे काम सुरू झाले आहे. बुधवारी (दि. ३१) रात्रीपासून शहरात मध्यरात्री बैठकांचे सत्र सुरू झाले असून त्याठिकाणी ‘डील फायनल’ केली जात आहे. यासाठी कोट्यवधी रुपयांचा सौदा होत असून महापालिका निडणुकीच्या निमित्ताने शहरात घोडेबाजर तेजीत सुरू झाला आहे. बिनविरोधची आशा भोसरी विधानसभा मतदारसंघातील रवी लांडगे हे बिनविरोध होण्याची शक्यता आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या उमेदवाराने अर्ज भरलाच नाही. तर काही पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज बाद झाले. त्यामुळे ते बिनविरोध होतील. मात्र, त्यांच्याप्रमाणेच आपणही बिनविरोध व्हावे असे स्वप्न अनेक बलाढ्य उमेदवारांना पडायला लागले आहे.