प्रभात वृत्तसेवा पिंपरी – निळ्या पूररेषेत अडकलेल्या नागरिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित समस्यांना तोडगा मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. पिंपळे गुरव येथे आयोजित खासगी कार्यक्रमात सहकारी गृहरचना संस्था आणि अपार्टमेंट रहिवासी चिंचवड यांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात निळ्या पूररेषेतील अधिकृत इमारतींना पुनर्विकास करताना टीडीआर देण्यात यावा ही प्रमुख मागणी करण्यात आली. निवेदन स्वीकृत करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागरिकांना लवकरच दिलासा देणारा निर्णय जाहीर करण्याचे आश्वासन दिले.यावेळी आमदार शंकर जगताप, सामाजिक कार्यकर्ते योगेश चिंचवडे, माजी नगरसेवक सुरेश भोईर, ॲड. मोरेश्वर शेडगे तसेच संघटनेचे पदाधिकारी राजेंद्र वाकोडे आणि नितीन कुलकर्णी उपस्थित होते. शिष्टमंडळाशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी निळ्या पूररेषेसंदर्भात फेर सर्वेक्षणासाठी समिती स्थापन केल्याचे सांगितले. त्या अहवालाच्या आधारे नागरिकांना न्याय्य व दिलासादायक निर्णय देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. चिंचवडमधील प्रभाग क्रमांक १८ मधील परिस्थिती गंभीर असून निळ्या पूररेषेत तब्बल १३० सोसायट्यांमध्ये सुमारे १५ हजार नागरिक वास्तव्यास आहेत. निळ्या पूररेषेतील अधिकृत इमारतींना टीडीआर देणे बंद झाल्याने पुनर्विकासाची प्रक्रिया ठप्प झाली आहे. जुन्या व जीर्ण इमारतींमुळे नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला असून या पार्श्वभूमीवर हा दिलासा महत्त्वाचा ठरणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आश्वासनामुळे निळ्या पूररेषेतील नागरिकांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला असून पुनर्विकासाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.