प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीने बहुमत मिळवत एकहाती सत्ता मिळवली आहे. आता महापौर कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शहरामध्ये भाजपामध्ये भोसरी आणि चिंचवड असे दोन गट आहे. तर पिंपरी विधानसभेमध्ये देखील पडद्याआडून सूत्रे हलविणाऱ्या चाणक्यांची चलती आहे. नक्की कोणाला महापौर, स्थायी समिती यासारखी महत्वाची पदे मिळणार याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थापनेपासून भाजप कायमच विरोधी बाकावर बसत होता. मात्र, सन २०१७ मध्ये भाजपाने दमदार कामगिरी करत ७७ जागा मिळवल्या होत्या. त्यावेळी पालिकेतील बहुसंख्य नगरसेवक नवखे होते. असे असतानाही नवख्या नगरसेवकांना देखील महापौर पद, स्थायी समितीचे सभापतीपद अशा महत्वाच्या पदांवर काम करण्याची संधी पक्षाने दिली. सन २०१७ ते २०२२ या काळात नितीन काळजे, राहुल जाधव, माई ढोरे यांनी महापौरपद सांभाळले. तर सीमा सावळे, ममता गायकवाड, विलास मडेगिरी, संतोष लोंढे, ज्ञानेश्वर लांडगे यांनी स्थायी समितीचे सभापतीपद सांभाळले. आता पुन्हा एकहाती सत्ता आल्यामुळे महापौर पदाची संधी कोणाला मिळणार याकडे लक्ष लागले आहे. तर सत्तास्थापनेचे आकडे समोर आल्यानंतर तातडीने नवनिर्वाचित नगरसेवकांनी वशिला लावण्यास सुरूवात केली आहे. मात्र, भोसरी की चिंचवड गटाला महापौरपद मिळणार हे शहरातील नेत्यांच्या बैठकीतच ठरणार आहे. त्यासाठी आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, अमित गोरखे, उमा खापरे आणि शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी फासे टाकायला सुरूवात केली आहे. शहर पातळीवर हे नेते काम करत असले तरी महापौरपद आणि स्थायी समितीच्या सभापतींबाबत वरिष्ठ पातळीवरूनच निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सोडत कधी निघणार? महापालिका निवडणुकीच्या निकाल लागून नवे सत्ताधारी कोण हे स्पष्ट झाले असले तरी अद्याप, महापौरपदाचे आरक्षण जाहीर झालेली नाही. त्यामुळे पुढील काही दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच महापौरपदासाठी नेमकी कोणाला संधी मिळणार हे स्पष्ट होणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये गेल्या दोन वेळा सर्वसाधारण व सर्वसाधारण महिला गटासाठी महापौर पद राखीव होते. त्यामुळे या महापौरपदाची सोडत कधी निघणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. हे आरक्षण २६ जानेवारीच्या आतमध्ये होणार असल्याची माहिती आहे.