खोपोली – खोपोली नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. नगराध्यक्ष पदासाठी सात उमेदवार तर नगरसेवक पदासाठी तब्बल ११८ उमेदवार रिंगणात होते. सकाळपासूनच काही मतदान केंद्रांवर मशीन बंद पडण्याच्या तांत्रिक अडचणींमुळे उमेदवार आणि मतदारांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु प्रशासनाने तातडीने दुरुस्ती करून मतदान सुरळीत सुरू केले. दुपारी बारा वाजेपर्यंत सुमारे ५० टक्के मतदानाची नोंद झाली. त्यानंतर मतदारांनी अधिक उत्साहाने मतदानाचा हक्क बजावला. काही भागात किरकोळ तणाव निर्माण झाल्याने खबरदारी म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या निवडणुकीत एकीकडे शिवसेना (शिंदे गट) – भाजपा – आरपीआय महायुतीचे उमेदवार कुलदीपक शेंडे आणि दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) – शिवसेना (ठाकरे गट) – शेकाप यांच्या परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार सुनील पाटील यांच्यात थेट लढत पाहायला मिळाली. गेल्या १५ दिवसांत खोपोली शहर निवडणूक प्रचाराने अक्षरशः दणाणून गेले होते. प्रमुख नेत्यांच्या दोन मोठ्या प्रचार सभांमुळे वातावरण अधिकच तापले होते. राष्ट्रवादी परिवर्तन विकास आघाडीच्या सभेला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित होते, तर दुसरीकडे महायुतीच्या सभेला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि आमदार महेंद्र थोरवे यांनी हजेरी लावून मतदारांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न केला. तांत्रिक बिघाडामुळे मतदानात विलंब सकाळी काही मतदान केंद्रांवर ईव्हीएम बंद पडल्याने सुरूवातीलाच मतदानाची प्रक्रिया थांबली. अनेक उमेदवारांनी यावर नाराजी व्यक्त केली. मात्र अधिकाऱ्यांनी तातडीने दुरुस्ती करून मतदान सुरू केले. मात्र या प्रकारामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, परंतु पोलिसांनी त्वरीत हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. काही केंद्रांवर मतदानाचा वेग कमी झाल्याने आणि मशीनमध्ये झालेल्या बिघाडामुळे अनेक ठिकाणी मतदान प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. आता लक्ष निकाल मंगळवारी मतदान झाल्यानंतर आता खोपोलीकरांची नजर निकालावर स्थिरावली आहे. त्या दिवशी मतमोजणी होणार असून सात नगराध्यक्ष आणि ११८ नगरसेवक पदांच्या उमेदवारांचे राजकीय भवितव्य उघड होणार आहे.