वडगाव मावळ – वडगाव नगरपंचायतीच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत मतदारांनी स्पष्टपणे बदलाचा कौल दिला असून, अनुभवाच्या जोडीला नव्या नेतृत्वाला संधी दिली आहे. एकूण १७ नगरसेवकांपैकी तब्बल १२ नव्या चेहऱ्यांना संधी देत मतदारांनी प्रस्थापित, मातब्बर नेत्यांना बाजूला ठेवले आहे. विशेष म्हणजे माजी नगराध्यक्षांसह पाच माजी नगरसेवकांना यावेळी मतदारांनी स्पष्ट नकार दिल्याने मावळातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या निवडणुकीत नगराध्यक्षपदासह नगरपंचायतीची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसकडे कायम राहिली आहे. नगरसेवक पदाच्या १७ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसने ९ जागांवर विजय मिळवून स्पष्ट बहुमत मिळवले, तर भारतीय जनता पक्षाला सहा जागांवर समाधान मानावे लागले. उर्वरित दोन जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले. त्यामुळे वडगाव नगरपंचायतीत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता पुन्हा प्रस्थापित झाली आहे. या निवडणुकीचा सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे मतदारांनी नव्या चेहऱ्यांना दिलेला कौल. नवनिर्वाचित नगरसेवकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून पूनम भोसले, सुनीता ढोरे, अजय भवार, आकांक्षा वाघवले, अजय म्हाळसकर आणि वैशाली सोनवणे यांचा समावेश आहे. तर भाजपकडून रोहित धडवले, विशाल वहिले, अनंता कुडे आणि राणी म्हाळसकर हे नवे चेहरे निवडून आले आहेत. याशिवाय रूपाली ढोरे आणि सारिका चव्हाण हे दोन अपक्ष उमेदवारही प्रथमच नगरपंचायतीच्या सभागृहात दाखल झाले आहेत. याउलट, मागील पंचवार्षिकमध्ये नगरसेवक म्हणून काम केलेले भाजपचे दिनेश ढोरे आणि अर्चना म्हाळसकर, राष्ट्रवादीच्या माया चव्हाण यांच्यासह स्वीकृत नगरसेवक म्हणून कार्यरत असलेले सुनील ढोरे आणि गणेश म्हाळसकर यांनाच केवळ पुन्हा संधी मिळाली आहे. उर्वरित बहुतांश जुन्या चेहऱ्यांना मतदारांनी बदलाचा इशारा दिला. एकूणच, वडगाव नगरपंचायत निवडणुकीत मतदारांनी अनुभव आणि बदल यांचा समतोल साधत नव्या नेतृत्वाला स्पष्ट प्राधान्य दिले आहे. राष्ट्रवादीची सत्ता कायम राहिली असली तरी, नव्या चेहऱ्यांच्या मोठ्या संख्येमुळे आगामी काळात नगरपंचायतीच्या कारभारात नवे विचार, नव्या अपेक्षा आणि बदलाची स्पष्ट चाहूल लागली आहे. माजी दिग्गजांना पराभवाचा धक्का या निवडणुकीत अनेक मातब्बर नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक राजेंद्र कुडे आणि चंद्रजीत वाघमारे, भाजपचे किरण म्हाळसकर आणि दिपाली मोरे, तसेच मनसेच्या माजी नगरसेविका सायली म्हाळसकर यांना मतदारांनी नाकारले. या निकालामुळे स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. प्रभागनिहाय लढतीत मोठी उलथापालथ प्रभागनिहाय निकाल पाहता, यावेळी अनेक प्रस्थापित बालेकिल्ल्यांना खिंडार पडले. भाजपच्या पाच आणि राष्ट्रवादीच्या चार बालेकिल्ल्यांमध्ये सत्ताबदल झाला आहे. राष्ट्रवादीने काही पारंपरिक भाजपप्रभुत्व असलेल्या प्रभागांत विजय मिळवला, तर भाजपनेही काही राष्ट्रवादीच्या कणखर प्रभागांत धक्का दिला आहे.