प्रभात वृत्तसेवा वडगाव मावळ – वडगाव नगरपंचायतीची निवडणूक पार पडून जवळपास पंधरा दिवसांचा कालावधी उलटला असला तरी अद्याप उपनगराध्यक्षपदाची निवड झालेली नाही. थेट जनतेतून नगराध्यक्षांची निवड होऊनही उपनगराध्यक्ष कोण होणार आणि ही निवड प्रक्रिया नेमकी कधी पार पडणार, याबाबत नगरपंचायत वर्तुळात उत्सुकता वाढली आहे.निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निर्विवाद बहुमत मिळवत नगरपंचायतीवर सत्ता प्रस्थापित केली आहे. विजयी झालेल्या सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ मंगळवारी (दि. ६) सकाळी १० वाजता नगरपंचायत सभागृहात आयोजित करण्यात आला असून, या कार्यक्रमाला आमदार सुनील शेळके उपस्थित राहणार आहेत.वडगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अबोली मयूर ढोरे यांची निवड झाली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे पूनम भोसले, सुनीता ढोरे, अजय भवार, माया चव्हाण, आकांक्षा वाघवले, सुनील ढोरे, गणेश म्हाळसकर, अजय म्हाळसकर आणि वैशाली सोनवणे हे नगरसेवक निवडून आले आहेत. तर भाजपकडून दिनेश ढोरे, रोहित धडवले, विशाल वहिले, अनंता कुडे, राणी म्हाळसकर आणि अर्चना म्हाळसकर हे नगरसेवक आहेत. अपक्ष म्हणून रूपाली ढोरे आणि सारिका चव्हाण यांनी निवडणूक जिंकली आहे. या संख्याबळामुळे नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे स्पष्ट वर्चस्व निर्माण झाले असून, पदग्रहण समारंभानंतर प्रशासनिक व राजकीय हालचालींना वेग येणार असल्याचे चित्र आहे. गट स्थापनेची प्रक्रिया सुरू निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नगरपंचायतीत पक्षीय गटांची औपचारिक स्थापना केली जाते. त्यानुसार वडगाव नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप असे दोन प्रमुख गट स्थापन होणार आहेत. सध्या दोन्ही पक्षांकडून गट स्थापनेची प्रक्रिया सुरू असून, त्यासाठी हालचाली वेग घेत आहेत. अपक्ष नगरसेविका रूपाली ढोरे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटात सहभागी होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. तर अपक्ष नगरसेविका सारिका चव्हाण या पूर्वाश्रमीच्या भाजप कार्यकर्त्या असल्याने त्यांचा समावेश भाजपच्या गटात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र राष्ट्रवादीकडून त्यांनाही आपल्या गटात घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा नगरपंचायत वर्तुळात रंगू लागली आहे. उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती कधी? नगरपंचायत कायद्यानुसार गट स्थापना झाल्यानंतरच उपनगराध्यक्ष तसेच स्वीकृत नगरसेवक पदाची नियुक्ती केली जाते. सध्या केवळ पदग्रहण समारंभ होणार असून, गट स्थापना प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच पुढील टप्प्यात उपनगराध्यक्ष निवड आणि स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपनगराध्यक्षपदाची निवड नेमकी कधी होणार, कोणाच्या गळ्यात हे पद जाणार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत कोणत्या नावावर शिक्कामोर्तब होणार, याकडे नगरपंचायतमधील राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवणाऱ्यांचे लक्ष लागले आहे.