वडगाव मावळ – वडगाव नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील गणेश ढोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच स्वीकृत नगरसेवकपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरीनाथ राजाराम ढोरे व भारतीय जनता पक्षाचे संदीप भास्करराव म्हाळसकर यांचीही बिनविरोध निवड झाली. या निवड प्रक्रियेचे पीठासन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष अबोली मयूर ढोरे यांनी काम पाहिले. निवड प्रक्रिया पारदर्शक व कायदेशीर बाबींची पूर्तता करत पार पाडण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम उपस्थित होते. सोमवारी (दि. १२) सकाळी ११ वाजता उपनगराध्यक्षपदासाठी नामनिर्देशन अर्ज सादर करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनील ढोरे, तर भाजपकडून अर्चना म्हाळसकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र छाननीनंतर माघारीच्या मुदतीत भाजपच्या उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याने सुनील ढोरे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. स्वीकृत नगरसेवकपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पंढरीनाथ ढोरे आणि भाजपकडून संदीप म्हाळसकर यांचा प्रत्येकी एकच अर्ज आल्याने दोन्ही निवडी बिनविरोध झाल्या. नगराध्यक्ष अबोली ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली या निवडी अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आल्या. निवडीनंतर नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांचा नगरपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला. वडगाव नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ९, भाजप महायुतीचे ६, तर २ अपक्ष नगरसेवक निवडून आले आहेत. यावेळी भाजपाचे प्रभारी भास्करराव म्हाळस्कर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, गणेश ढोरे, सुधाकर शेळके, माजी सभापती गुलाब म्हाळसकर, अशोक बाफना गटनेते अजय बाळासाहेब म्हाळसकर, पक्षनेत्या माया चव्हाण, तसेच नगरसेवक अनंता कुडे, विशाल वहिले, गणेश म्हाळसकर, पूनम भोसले, सुनीता ढोरे, वैशाली सोनवणे, राणी म्हाळसकर, रोहित धडवले, अजय भवार आदी उपस्थित होते. ‘नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक व प्रशासन यांच्याशी समन्वय साधून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करणार असून नागरिकांच्या मूलभूत सुविधांना सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल.’ – सुनील ढोरे, नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष, वडगाव