वडगाव मावळ– मावळ तालुक्यातील तीन स्थानिक संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका मंगळवारी (दि. २) पार पडल्या. वडगाव नगरपंचायत, तळेगाव दाभाडे नगरपरिषद आणि लोणावळा नगरपरिषद या ठिकाणी सकाळी ७.३० वाजता मतदानास प्रारंभ झाला. मतदारांच्या प्रतिसादात काही ठिकाणी उत्स्फूर्त, तर काही ठिकाणी काहीशी उदासीनता जाणवली. एकूण मतदानाचा कल पाहता, मावळचा कौल आता मतपेटीत बंदिस्त झाला आहे. या निवडणुकीचा निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर होणार असून सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. वडगावात उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी ४ उमेदवार रिंगणात असून एकूण १७ प्रभागांसाठी ४५ उमेदवारांचे भवितव्य आता ठरणार आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे १७, भाजपचे १७, शिवसेना (शिंदे गट) १ व शिवसेना (उबाठा) १ आणि १३ अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे सकाळी मतदानाची सुरूवात झाल्यानंतर पहिल्या दोन तासांत वेग मंद होता. परंतु सकाळी १० नंतर मतदार मोठ्या संख्येने केंद्रांवर पोहोचले. दुपारच्या उष्णतेकडे दुर्लक्ष करत अनेकांनी मतदानाचा हक्क बजावला. महिलांची उपस्थिती विशेष लक्षणीय होती. दुपारी ३.३० वाजेपर्यंत मिळालेल्या प्राथमिक आकडेवारीनुसार ६,१७४ पुरुष आणि ६,०१८ महिला मतदारांनी मतदान केले असून एकूण मतदान १२,१९२ वर पोहोचले. तर शेवटच्या टप्प्यात सुमारे ७३ टक्के मतदान झाले. तळेगावात मतदानाचा टक्का घसरला तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये मतदारांच्या उदासीनतेमुळे मतदानाचा टक्का घसरल्याचे दिसून आले. शहरातील ७१ मतदान केंद्रावर अवघे ४९ टक्के इतके मतदान झाले आहे. नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान शहरातील १४ प्रभागातील ७१ मतदान केंद्रावर सुरू झाले. यामध्ये नगराध्यक्ष पदाकरिता सर्व ठिकाणी मतदान करण्यात आले. तर प्रभाग क्रमांक ३अ व ३ ब, प्रभाग क्रमांक ५ब व प्रभाग क्रमांक १०अ या प्रभागातील मतदान केंद्रावर नगरसेवक पदाचे मतदान संपन्न झाले. निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना तांबे यांनी मतदान केंद्रावर जाऊन प्रत्यक्षात पाहणी केली. सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी मतदानास सुरुवात झाली. सकाळी थंडीमुळे पहिल्या दोन तासात सर्व केंद्रावर अवघे ७.४% इतके मतदान झाले. पुढील २ तासात साडेअकरा पर्यंत १६.२८% मतदान झाले. पुढे १ वाजून ३० मिनिटापर्यंत २६.३९% मतदान झाले. पुढे ३ वाजून ३० मिनिटापर्यंत ३६.५७% मतदान झाले होते. शेवटच्या टप्प्यात मतदानाचा टक्का सुमारे ४९.२४ पर्यंत पोहोचला. निवडणुकीसाठी उमेदवाराकडून आपापल्या भागात मतदारांना माहिती देण्यासाठी पक्षाचे बुथ तयार करण्यात आले होते. नगराध्यक्षाच्या निवडणुकीसाठी सर्व प्रभागातील उमेदवारांनी बूथची उभारणी केली होती. यावेळी बूथ वरील कार्यकर्ते मतदारांना मार्गदर्शन करत होते. नावांच्या गफलतींमुळे मतदारांची धावपळ मतदान यादीतील चुकीमुळे अनेक मतदारांची नावे अन्य प्रभागांमध्ये असल्याचे समोर आले. यामुळे काहींना अनेक केंद्रांची पायपीट करावी लागली. काहींनी संताप व्यक्त करत मतदान न करण्याचा निर्णय घेतला. लोणावळ्यात काही काळ तणावपुर्ण वातावरण लोणावळ्यात सकाळपासून शहरातील सर्व १३ प्रभागांमध्ये मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी ७.३० वाजता मतदानास सुरुवात झाली असून एकूण ६३ मतदान केंद्रांवर मतदारांनी लांबलचक रांगा लावल्या होत्या. लोणावळा शहरातील एकूण मतदारसंख्या ४८,३७३ असून त्यात पुरुष २४,१२०, महिला २४,२५२ आणि इतर १ मतदारांचा समावेश आहे. अध्यक्षपदासाठी सात उमेदवार आणि सदस्यपदासाठी ७८ उमेदवारांनी आपले नशीब आजमावले आहे. प्रभाग क्र.९ मधील बुथ क्र. ५ (पिंक बूथ) विशेष आकर्षण ठरला. सकाळी ७.३० ते ११.३० दरम्यान २२.९७% मतदान झाले. दुपारी ३.३० वाजता मतदानाचा टक्का ५५.८६% पर्यंत वाढला. मतदानाच्या अंतिम टप्प्यात मतदानाचा आकडा सुमारे ७१ टक्क्यांपर्यंत पोहोचला. काही केंद्रांवर मतदान यंत्रांचा खोळंबा प्रभाग क्रमांक ६ मधील बुथ क्रमांक ५ आणि प्रभाग क्रमांक ८ मधील बुथ क्रमांक १ येथे मतदान यंत्र तांत्रिक कारणामुळे काही काळ बंद पडल्याने मतदान थांबले होते. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तत्काळ भेट देऊन यंत्रे सुरू केली, त्यानंतर मतदान सुरळीत सुरू राहिले. प्रभाग ४ आणि १३ मध्ये विरोधी कार्यकर्त्यांमध्ये तणाव शहरातील प्रभाग क्रमांक ४ आणि १३ येथे मतदानादरम्यान विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ कारणावरून तीव्र बाचाबाची झाली. अचानक निर्माण झालेल्या गैरसमजातून परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण होते. स्थानिक कार्यकर्त्यांनी वेळेत हस्तक्षेप करून दोन्ही गटांना शांत केले. यानंतर लोणावळा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत परिस्थिती नियंत्रणात आणली. पुढील मतदान मात्र पूर्णतः शांततेत पार पडले.