वडगाव मावळ – मावळ तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात थेट सामना होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेससोबत कोणत्याही परिस्थितीत युती केली जाणार नाही, अशी ठाम भुमिका भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी राज्यमंत्री संजय भेगडे यांनी सोमवारी (दि. १९) आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केली. भाजप कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेमुळे मावळ तालुक्यातील राजकीय वातावरण अधिक तापले असून निवडणूक लढत तीव्र होण्याचे संकेत मिळाले आहेत. भेगडे यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांच्या जुन्या वक्तव्याचा उल्लेख करत, तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीत भाजपसोबत युती करून चूक झाली, असे आमदार शेळके यांनी जाहीरपणे मान्य केले होते. त्यामुळे पुन्हा राष्ट्रवादीसोबत युती करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असा स्पष्ट संदेश दिला आहे. भाजपने या निवडणुकीसाठी शिंदेंची शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्यासोबत महायुती करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती भेगडे यांनी दिली. त्यानुसार शिंदेंच्या शिवसेनेला पंचायत समितीच्या टाकवे गणातून, तर रिपब्लिकन पार्टी आठवले गटाला खडकाळे गणातून उमेदवारी देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. महायुतीची पहिली यादी जाहीर पत्रकार परिषदेत महायुतीच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. इंदोरी-वराळे जिल्हा परिषद गटातून मेघा प्रशांत भागवत यांना भाजपकडून अधिकृत उमेदवारी देण्यात आली असून, यामुळे या गटातील लढत अधिक रंगतदार होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यासोबतच इंदोरी गणातून श्रीकृष्ण अण्णासाहेब भेगडे, वराळे गणातून रवींद्र निवृत्ती शेटे, चांदखेड गणातून सुवर्णा बाळासाहेब घोटकुले, उर्से गणातून बाळासाहेब नथू पारखी, काले गणातून सीमा मुकुंदराव ठाकर, कार्ला गणातून रंजना सुरेश गायकवाड, टाकवे गणातून अश्विनी सोमनाथ कोंडे (शिंदेसेना) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शक्तीप्रदर्शनाची तयारी महायुतीकडून पंचायत समितीच्या गणनिहाय उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. उर्वरित उमेदवारांची घोषणा मंगळवारी संध्याकाळी करण्यात येणार असल्याची माहिती देताना भेगडे यांनी सांगितले की, मंगळवारी वडगाव मावळ येथे महायुतीच्या सर्व १५ उमेदवारांचा संयुक्त अर्ज भरण्यासाठी मिरवणूक काढण्यात येणार आहे. या शक्तिप्रदर्शनातून महायुतीची ताकद दाखवली जाणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. या पत्रकार परिषदेनंतर मावळ तालुक्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून, आगामी निवडणुकीत महायुती विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी थेट लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत प्रचार अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसून येत आहेत.