प्रभात वृत्तसेवा खालापूर – खालापूर तालुक्यातील घोडीवली-नावंढे रस्त्यावर शुक्रवारी (दि. १२) रात्री साडेनऊच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात पोसरी येथील तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. दुचाकीवरील नियंत्रण सुटून रस्त्यालगतच्या झाडाला जोरदार धडक बसल्याने ही दुर्दैवी घटना घडली.अपघातात मृत तरुणाचे नाव अनिरुद्ध खानविलकर (रा. पोसरी, ता. कर्जत) असे आहे. हा तरुण खालापूरहून पोसरीकडे जात असताना घोडीवली-नावंढे गावाच्या मध्यवर्ती भागात हा अपघात झाला. त्याचे दुचाकीवरील (क्र. एमएच ४६ सीएक्स ५१०३) नियंत्रण सुटल्याने वाहन थेट झाडावर आदळले. धडकेची तीव्रता इतकी होती की अनिरुद्ध याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, वाढता वेग आणि बेफिकीर वाहनचालकांमुळे तरुणांचे प्राण जात असल्याबद्दल नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली.