प्रभात वृत्तसेवा तळेगाव दाभाडे – तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज शांततेत आणि उत्साहात पार पडले. न्यायालयीन आदेशानुसार चार प्रभागांतील पाच नगरसेवक पदांसाठी घेण्यात आलेल्या या मतदानात एकूण ५७.४३ टक्के मतदान झाले. पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या तुलनेत ही टक्केवारी अधिक होती. त्यामुळे यावेळी मतदारांचा सहभाग अधिक असल्याचे दिसून आले. तळेगाव दाभाडे नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक २ डिसेंबर रोजी पार पडली. मात्र काही प्रभागांतील मतदान प्रक्रियेबाबत न्यायालयीन आदेश झाल्यामुळे चार प्रभागांतील पाच नगरसेवक पदांची निवड रखडली होती. त्यानुसार प्रभाग क्रमांक २-ब, ७-ब, ८-अ, ८-ब आणि १०-ब या प्रभागांमध्ये मतदान घेण्यात आले.सकाळी ७.३० वाजता मतदानास सुरुवात झाली. सुरुवातीच्या दोन तासांत मतदानाचा वेग काहीसा संथ होता. सकाळी ९.३० वाजेपर्यंत ८.५४ टक्के मतदान झाले. त्यानंतर हळूहळू मतदानात वाढ होत गेली. ११.३० वाजेपर्यंत २१.२७ टक्के, तर दुपारी १.३० वाजेपर्यंत ३५.८६ टक्के मतदानाची नोंद झाली. दुपारनंतर मात्र मतदानाचा वेग वाढला. सायंकाळी ३.३० वाजेपर्यंत ४६.७५ टक्के मतदान झाले, तर शेवटच्या दोन तासांत मतदारांनी मोठ्या संख्येने मतदानासाठी गर्दी केल्याने अखेर ५७.४३ टक्के मतदान झाले. पहिल्या टप्प्याच्या तुलनेत वाढ २ डिसेंबर रोजी झालेल्या पहिल्या टप्प्यात नगराध्यक्ष पदासह इतर नगरसेवक पदांसाठी केवळ ४९.२४ टक्के मतदान झाले होते. त्या तुलनेत दुसऱ्या टप्प्यातील मतदानात सुमारे आठ टक्क्यांची वाढ झाल्याने राजकीय पक्षांमध्येही उत्सुकता वाढली आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदारांनी दाखविलेला उत्साह पाहता निकालावर त्याचा महत्त्वाचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मतदान केंद्रांवर चोख बंदोबस्त दुसऱ्या टप्प्यात शहरातील एकूण २० मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. एमआयटी प्री-स्कूल कॅम्पस, मायमर हॉस्टेल कॅम्पस, माउंट सेंट अँड स्कूल, नवीन समर्थ विद्यालय, सह्याद्री हायस्कूल तसेच थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे पाटील प्राथमिक शाळा आदी ठिकाणी मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली होती. सर्व मतदान केंद्रांवर पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. आज ७१ मतदान केंद्रांवरील मतमोजणी या निवडणुकीची मतमोजणी नगर परिषदेच्या नूतन इमारतीतील तळमजल्यावर सकाळी १० वाजता सुरू होणार आहे. एकूण ७१ मतदान केंद्रांवरील मतमोजणी करण्यात येणार असून, दोन तासांत सर्व निकाल स्पष्ट होतील, असा अंदाज निवडणूक प्रशासनाने व्यक्त केला आहे. निकालाकडे उमेदवारांसह संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.