प्रभात वृत्तसेवा वडगाव मावळ – पुणे आणि लोणावळा या दोन शहरांना जोडणाऱ्या उपनगरीय रेल्वे सेवेला तब्बल ४७ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, या मार्गावरील वाढता ताण कमी करण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचा विस्तार अद्यापही कागदी घोडे नाचवण्यातच अडकला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या नव्या मार्गिकांची मागणी प्रवासी संघटनांकडून केली जात आहे, परंतु प्रशासकीय उदासीनतेमुळे या प्रकल्पाला अद्याप अपेक्षित गती मिळालेली नाही. परिणामी, हजारो प्रवाशांचा दररोजचा प्रवास अत्यंत खडतर आणि विलंबाचा होत आहे. रोज सुमारे एक लाख नागरिक ज्या सार्वजनिक वाहतूक यंत्रणेवर अवलंबून आहेत. तिच्याबाबत सरकार आणि रेल्वे प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी लागणाऱ्या अवाढव्य निधीचे नियोजन प्रशासकीय पातळीवर करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या हिश्श्यातील एकूण २ हजार ५५० कोटी रुपयांच्या निधीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचा मोठा सहभाग निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका ५१० कोटी रुपये, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका ५१० कोटी रुपये आणि पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) ७६५ कोटी रुपयांचा वाटा उचलणार आहे. निधीचे हे वाटप निश्चित झाले असले तरी, प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्यासाठी लागणारी प्रशासकीय तत्परता अद्याप दिसून आलेली नाही. जेव्हा देशाच्या रेल्वेचे बजेट वेगळे सादर केले जात होते, तेव्हापासून या मार्गाच्या विस्तारीकरणासाठी तरतूद आणि घोषणा केल्या जात आहेत. अनेक वर्ष केवळ तरतुदी आणि घोषणाच होत राहिल्या परंतु प्रत्यक्षात हे काम सुरूच झाले नाही. केवळ सर्वेक्षण केले जाते आणि खर्चाचे आराखडे मांडले जातात. सर्व काही केवळ कागदारवरच आहे. सध्या पुणे-लोणावळा मार्गावर केवळ दोनच मार्गिका उपलब्ध आहेत. याच मार्गावरून लांब पल्ल्याच्या गाड्या, मालगाड्या आणि लोकल धावत असल्याने रेल्वे वाहतुकीवर प्रचंड ताण येतो. अनेकदा एक्स्प्रेस गाड्यांना मार्ग देण्यासाठी लोकल ट्रेनला स्थानकांवर रोखून धरले जाते,ज्यामुळे चाकरमान्यांचे आणि विद्यार्थ्यांचे मोठे हाल होतात. तिसरी आणि चौथी मार्गिका झाल्यास उपनगरीय गाड्यांसाठी स्वतंत्र मार्ग उपलब्ध होईल, ज्यामुळे लोकलच्या फेऱ्या वाढवणे आणि वेळेत गाड्या चालवणे शक्य होणार आहे.उपनगरीय रेल्वे सेवेने प्रवासाचे अर्धशतक जवळ केले असतानाही पायाभूत सुविधांच्या बाबतीत हा मार्ग पिछाडीवरच आहे. पिंपरी-चिंचवड आणि पुणे या औद्योगिक पट्ट्यातील हजारो नागरिक या रेल्वेवर अवलंबून आहेत. निधीचा वाटा ठरूनही प्रकल्पाचे काम रखडल्याने प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे. आता या प्रकल्पाला कधी प्रत्यक्ष मुहूर्त लागणार आणि कागदावरच्या या मार्गिका कधी रुळावर येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लोकलचा इतिहास मध्य रेल्वेने ११ मार्च १९७८ रोजी पुणे जंक्शन आणि लोणावळा दरम्यान ६०.५९ किमी मार्गावर पहिली लोकल सेवा सुरू केली. सुरुवातीला ही सेवा केवळ एका ट्रेन सेटसह (रेक) आणि दिवसातून फक्त दोन फेऱ्यांनी सुरू झाली होती १९७८ मध्ये ही लोकल ९ डब्यांची होती, जी २००९ मध्ये १२ डब्यांची करण्यात आली. सध्या या मार्गावर दररोज ४० पेक्षा जास्त फेऱ्या चालवल्या जातात सुरुवातीला ही लोकल सेवा डायरेक्ट करंट (DC) वर धावत होती. कालांतराने यात बदल झाले आणि आता आधुनिक ट्रेन (Siemens Rake) धावत आहेत.