प्रभात वृत्तसेवा पिंपरी – महापालिका निवडणुकीची घोषणा झाल्यापासून शहरात राजकीय गोंधळाचे वातावरण दिसत होते. हा गोंधळ खरोखरीच होत होता की ही एक राजकीय खेळी होती, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. महायुतीतील मित्र पक्ष असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यातच लढत असल्याचे चित्र निर्माण झाले. त्यातच अजित पवारांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेत महाविकास आघाडीची सगळी हवा काढून घेतली. यामुळे निवडणूक पूर्णत महायुतीने आपसातच लढली आणि महाविकास आघाडीतील घटक पक्ष निवडणुकीच्या आखाड्यात आपली उपस्थिती देखील पूर्णपणे दाखवू शकली नाही.शरद पवारांच्या राष्ट्रवादीने अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत संगनमत केल्यानंतर महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसच उरली होती. परंतु हे दोन्ही पक्ष शहरात आघाडी करुन उमेदवार रिंगणात उतरवू शकले नाहीत. र्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशीच महाविकास आघाडी बहुमताच्या जवळही जाऊ शकत नसल्याचे स्पष्ट झाले होते. कारण या दोन्ही पक्षांना 128 जागांसाठी 50-50 उमेदवार देखील देता आले नाहीत. काँग्रेस मागील महापालिका निवडणुकीत खाते देखील उघडू शकली नव्हती. तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील माजी नगरसेवकांसह अनेक पदाधिकार्यांनी पक्षाची साथ आधीच सोडली होती. अशा परिस्थितीत योग्य नियोजन करुन दोन्ही पक्षांनी मिळून रणनीती आखणे गरजेचे होते. परंतु या पक्षाच्या राज्यस्तरीय नेत्यांना पक्षाला शहरात अक्षरशः वार्यावर सोडून दिले. भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये अनेक दिग्गज नाराज होते. त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना सोबत घेत निवडणूक चुरशीची बनविण्याची गरज होती. परंतु दोन्ही पक्ष शहरात नेतृत्त्वहीन परिस्थितीत असल्याने कशाचा कशालाच मेळ लागत नव्हता. एकंदरीत अर्ज भरण्याच्या अखरेच्या दिवशीच महाविकास आघाडीने महायुतीला बाय दिल्याचे स्पष्ट झाले होते. सेनापतीविना लढले निवडणूक उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील स्थानिक पातळीवरील दोन बडे नेते आणि शहरप्रमुख यांना ऐन निवडणुकीपूर्वी पक्ष सोडला आणि स्थानिक पातळीवर पक्षाकडे प्रभावी नेतृत्त्व उरले नाही. ठाकरेंच्या शिवसेनेने लोकसभा निवडणुकीवेळी अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून संजोग वाघेरे यांना आयात करत मावळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. लोकसभा निवडणुकीत मोठ्या अंतराने पराभूत झाल्यानंतर पक्षाने वाघेरे यांच्यावर पक्षाची जबाबदारी सोपविली. परंतु ऐन निवडणुकीपूर्वी वाघेरे यांनी भाजपात प्रवेश केला आणि ठाकरेंच्या शिवसेनेला शहर प्रमुखाशिवाय निवडणूक लढवावी लागली. दुसरीकडे काँग्रेसच्या शहराध्यक्षांचे बंधू भाजपमध्ये गेले आणि उमेदवारी मिळविली. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु असतानाच काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम यांनी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. यापूर्वीच काँग्रेसचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या एकाधिकाराला कंटाळून पक्ष सोडून गेले होते. काँग्रेसला निम्म्या जागांवरही उमेदवार देता आले नाहीत. तसेच राज्य पातळीवरुन शहरातील उमेदवारांना अपेक्षित मदत मिळाली नाही. पक्षाला किमान खाते खोलता यावे, याचा देखील विचार पक्षश्रेष्ठींनी केला नाही आणि पक्षाची वाताहत या निवडणुकीतही कायम राहिली.