प्रभात वृत्तसेवा पिंपरी – अखेरच्या दिवशीपर्यंत इच्छुकांना झुलवत ठेवले. आपल्याला पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळेल की नाही? याबाबत शाश्वती नसल्याने प्रत्येक प्रभागातील इच्छुकांनी पक्षासोबत अपक्ष म्हणून देखील उमेदवारी अर्ज भरुन ठेवले आहेत. अर्ज छाननीमध्येही त्यांचे अर्ज टिकून राहिल्यानंतर आता मात्र पक्षातील वरिष्ठांना धडकी भरली आहे. परवापर्यंत इच्छुक आपल्या वरिष्ठ नेत्यांच्या मागे पळत होते आणि अधिकृत उमेदवारी मागत होते. आता तेच नेते या इच्छुकांना शोधत असून अर्ज मागे घेण्यासाठी मनधरणी करत आहेत.महापालिका निवडणुकीच्या आखाड्यात भाजप आणि दोन्ही राष्ट्रवादीमध्ये मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली आहे. शेवटपर्यंत एबी फॉर्म न दिल्याने अनेकांनी अपक्ष अर्ज दाखल केले आहेत. आता ज्यांना तिकीट मिळाले नाही, ते अपक्ष लढण्यावर ठाम आहे. त्यामुळे या बंडखोरांची मनधरणी करण्याचे मोठे आव्हान पक्षातील वरिष्ठ नेत्यांसमोर आहे. अर्ज माघारी घेण्यासाठी शुक्रवार (दि. २) हा आजचा शेवटचा दिवस आहे.महापालिकेच्या १२८ जागांसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. निवडणुकीच्या रिंगणामध्ये भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार), राष्ट्रवादी (शरद पवार), शिंदेसेना, काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना-मनसे, वंचित बहुजन आघाडीने उमेदवार दिले आहेत. भाजप-रिपाइंने १२८, दोन्ही राष्ट्रवादीने १२८, कॉग्रेसने ५२, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने ६९ जागांवर उमेदवार दिले असून, चार जागा पुरस्कृत केल्या आहेत. अन्य जागांवर शिंदेसेना काय निर्णय घेणार, गुलदस्त्यात आहे. पक्षाचे तिकीट मिळाले नाही, म्हणून अपक्ष लढणाऱ्यांची संख्या अधिक असली तरी, त्यामध्ये मातब्बरांची संख्या कमी आहे. आता अर्ज दाखल करतेवेळी इच्छुकांनी एबी फॉर्मसाठी अनेकवेळा फोन करून देखील नेत्यांकडून प्रतिसाद मिळत नव्हता. नेत्यांच्या घराचे आणि कार्यालयांचे उंबरे झिजविले. परंतु संपर्क होऊ शकला नव्हता किंवा अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर अनेक इच्छुकांनी अपक्ष लढण्याचा निर्धार केला. यापैकी काही उमेदवार माजी नगरसेवक आहेत आणि आपपल्या प्रभागात दांडगा जनसंपर्क असलेले आहेत. या उमेदवारांनी माघार न घेतल्यास मतांची गणिते बिघडू शकतात. यांनी माघार घ्यावी यासाठी प्रयत्न सुरू असून आता या उमेदवारांचा संपर्क होत नाही. विशेष म्हणजे त्यांना शोधण्यासाठी नेत्यांच्या कार्यालयातून फौज देखील दाखल होत आहे. मात्र, उमेदवार सापडत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे बंडखोरी रोखताना नेत्यांची दमछाक झाली आहे.