प्रभात वृत्तसेवा वडगाव मावळ – तालुक्यातील बेकायदा गौण खनिज उत्खनन प्रकरणात कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत निलंबित करण्यात आलेल्या महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी आता महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात (मॅट) धाव घेतली आहे. राज्य शासनाने केलेली निलंबनाची कारवाई नियमबाह्य, घाईगडबडीची आणि अन्यायकारक असल्याचा दावा करत संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या निलंबनाला आव्हान दिले आहे. मावळ तालुक्यात सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणावरील अवैध खाणकाम आणि गौण खनिज (दगड, मुरूम, वाळू) उत्खननामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाल्याचे ऑडिट अहवालातून उघड झाले होते. शासनाची दिशाभूल करणे तसेच वरिष्ठांच्या आदेशांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत राज्य शासनाच्या महसूल विभागाने संबंधित तहसीलदार आणि तत्कालीन नायब तहसीलदार यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. या निर्णयामुळे पुणे जिल्ह्यात प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती.निलंबित अधिकाऱ्यांनी मॅटसमोर मांडलेल्या याचिकेत प्रशासकीय कारवाईवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. कोणतीही सखोल चौकशी न करता केवळ प्राथमिक अहवालाच्या आधारे तातडीने निलंबन करणे, हे नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांना विरोधात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच, गौण खनिज उत्खननाच्या परवानग्या, मोजणी व तांत्रिक बाबी केवळ महसूल विभागाच्या अखत्यारित येत नसून, भूविज्ञान व खनिकर्म विभागासारख्या तांत्रिक विभागांचीही त्यात महत्त्वाची भूमिका असते, मात्र कारवाई करताना केवळ महसूल अधिकाऱ्यांनाच लक्ष्य करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. याशिवाय, अनेक प्रकरणांत अवैध उत्खननाबाबत दंडात्मक वसुलीची प्रक्रिया आधीच सुरू असताना थेट निलंबनासारखी कठोर कारवाई करण्यात आल्याचा मुद्दाही याचिकेत मांडण्यात आला आहे. त्यामुळे आपले निलंबन रद्द करून न्याय द्यावा, अशी मागणी संबंधित अधिकाऱ्यांनी केली आहे.दरम्यान, राज्य सरकारकडून या प्रकरणात आर्थिक अनियमितता झाल्याचा ठाम दावा करण्यात आला असून, प्रशासकीय शिस्त आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी निलंबन आवश्यक असल्याचे सरकार मॅटसमोर मांडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने या प्रकरणी शासनाला नोटीस बजावली असून, संबंधित कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतर पुढील सुनावणी होणार आहे. मावळ तालुक्यातील निसर्गसंपदेचा ऱ्हास आणि अवैध उत्खननाचा मुद्दा आधीच चर्चेत असताना, हे प्रकरण आता न्यायालयीन टप्प्यावर गेल्याने पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.