पिंपरी (प्रतिनिधी) – शहरात लोकशाहीचा कणा मानल्या जाणाऱ्या निवडणूक प्रक्रियेची अक्षरशः फरफट झाल्याचे चित्र समोर आले आहे. मतदानाच्या दिवशी सुरू झालेला गोंधळ मतमोजणीच्या दिवशी कळसाला पोहोचला आहे. ही निवडणूक आहे की थट्टा, असा संतप्त सवाल आता शहरभरातून विचारला जात आहे. मतदानाच्या दिवशी अनेक मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीन बंद पडणे, वारंवार अडकणे, तर काही ठिकाणी चुकीची माहिती दाखवणे अशा तक्रारींचा पाऊस पडला. तासन्तास रांगेत उभे असलेले मतदार हताशपणे परतताना दिसले. काही केंद्रांवर तर मतदार आणि कर्मचाऱ्यांमध्ये वादावादी झाली. या पार्श्वभूमीवर किमान मतमोजणी तरी सुरळीत होईल, अशी अपेक्षा होती. मात्र ती अपेक्षाही प्रशासनाने धुळीस मिळवली. मतमोजणी सुरू असतानाच अचानक संपूर्ण शहरातील प्रणाली कोलमडली. सर्व्हर डाऊन झाले, स्क्रीन गोठल्या आणि चालू निकाल थांबवण्यात आले. काही वेळानंतर जे आकडे पुन्हा दाखवले गेले होते, ते पाहून सर्वांनाच धक्का बसला. अनेक प्रभागांमध्ये आधी दाखवलेली आघाडी गायब झाली आणि सुरुवातीचेच आकडे पुन्हा झळकू लागले. या प्रकारामुळे उमेदवार, कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. आकडे पुढे-मागे कसे जातात, प्रणाली कोसळण्यामागे नेमके कारण काय, असे गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. औद्योगिक, आयटी आणि स्मार्ट सिटीचा टेंभा मिरवणाऱ्या पिंपरी-चिंचवडमध्ये जर निवडणूक यंत्रणा इतकी अपयशी ठरत असेल, तर हे केवळ तांत्रिक बिघाड म्हणून झटकून टाकता येणार नाही. ही लोकशाहीच्या मुळावर घाव घालणारी बाब आहे. तातडीने चौकशी, स्पष्ट उत्तरं आणि पूर्ण पारदर्शकता नसेल, तर नागरिकांचा व्यवस्थेवरील विश्वास कायमचा उडून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.