Talegaon Dabhade – तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नव्याने स्थापन होणाऱ्या विशेष समित्यांच्या निवडीसाठी बोलावण्यात आलेली विशेष सभा गणपूर्तीअभावी स्थगित करण्यात आली. त्यामुळे सभापती आणि सदस्यपदासाठी उत्सुक असलेल्या नवनिर्वाचित नगरसेवकांकडून आश्चर्य आणि नाराजी व्यक्त केली जात आहे.नगरपरिषदेची सार्वजनिक निवडणूक नुकतीच पार पडली. त्यानंतर उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत सदस्य पदाच्या निवडणुका पार पडल्या. आता सर्व नगरसेवकांचे लक्ष विषय समित्यांच्या सभापती आणि सदस्य निवडीकडे लागले होते. मात्र काही अपरिहार्य कारणांमुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने आयोजित करण्यात आलेली ही विशेष सभा गणपूर्तीअभावी पिठासन अधिकारी तथा मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी स्थगित असून या सभेचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला आहे. या विशेष सभेमध्ये नगरपरिषदेच्या स्थायी समिती, पाणीपुरवठा आणि जलनिसारण समिती, बांधकाम समिती, महिला व बालकल्याण समिती, नगर विकास नियोजन समिती, शिक्षण समिती तसेच स्वच्छता व आरोग्य समितीवरील सभापती व सदस्यांची निवड होणार होती. मात्र सभा न झाल्याने अनेक नगरसेवकांच्या अपेक्षांना तात्पुरता विराम लागला असून इच्छुक सदस्यांचा हिरमोड झाला आहे. राजकीय निर्णय रखडल्याचा परिणाम तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची निवडणूक महायुती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाने संयुक्तपणे लढवली होती. निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे १७, भाजपचे १० तर एक नगरसेविका अपक्ष म्हणून निवडून आली आहे. या संख्याबळानुसार समित्यांवरील पदवाटप होणे अपेक्षित आहे. परंतु सध्या मावळ तालुक्यात सुरू असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमुळे पक्षश्रेष्ठींना निर्णय घेण्यात विलंब होत असल्याने समित्यांची निवड होऊ शकलेली नाही. लवकरच यावर निर्णय घेतला जाईल, असे पक्षप्रतोद सत्यम खांडगे (राष्ट्रवादी काँग्रेस – अ) यांनी सांगितले आहे. नवनिर्वाचित नगरसेवकांची नाराजी नगरपरिषदेच्या निवडणुकीत नव्याने निवडून आलेल्या उत्साही नगरसेवकांना समित्यांमधून काम करण्याची संधी मिळणार होती. अनेक सदस्यांनी आपण कोणत्या समितीत काम करायचे याचा निर्णयही घेतला होता. मात्र समित्यांची निवड न झाल्याने नगरसेवकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.