प्रभात वृत्तसेवा तळेगाव दाभाडे – तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या हद्दीतील प्रभाग क्रमांक १४ मध्ये अनेक वर्षांपासून रखडलेली विकासकामे पूर्ण व्हावीत, यासाठी नवनिर्वाचित नगरसेवक सागर बोडके व नगरसेविका सुरेखा निलेश भेगडे यांच्या पुढाकाराने पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. या पाहणी दौऱ्यात नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील, मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांच्यासह नगर परिषदेचे संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी म्हसकरनेस कॉलनी १ व तुकारामनगर परिसराची पाहणी करण्यात आली. पाहणी दरम्यान गेल्या तीन ते चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या भुयारी गटारे, रस्ते, अंतर्गत पाणीपुरवठा योजना तसेच अंतर्गत विद्युत वाहिन्यांच्या कामांचा आढावा घेण्यात आला. परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेत नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना विकासकामे तातडीने पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.