प्रभात वृत्तसेवा तळेगाव दाभाडे – ग्रामीण भागातील रुग्णांना दर्जेदार व आधुनिक उपचार सहज उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने रुबी हॉल क्लिनिक आणि तळेगाव जनरल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने तळेगाव दाभाडे येथे नवे वैद्यकीय उपचार केंद्र उभारण्यात येणार असल्याचे मनोगत रुबी हॉल क्लिनिकचे प्रमुख डॉ. परवेश ग्रँड यांनी व्यक्त केले. तळेगाव जनरल हॉस्पिटलच्या शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके, संस्थेचे अध्यक्ष गणेश खांडगे, चिटणीस शैलेश शहा, डॉ. उदय देशमुख, डॉ. सुचित्रा नांगरे, डॉ. श्रीकांत जोशी, नितीन सरदेसाई, डॉ. सुधीर भाटे, डॉ. सत्यजित वाढोकर, हेमंत सरदेसाई, सत्यशीलराजे दाभाडे, वृषालीराजे दाभाडे, दीपक शहा, विनायक अभ्यंकर, चंद्रभान खळदे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार सुनील शेळके यांनी रुबी हॉल व तळेगाव जनरल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात येणाऱ्या हॉस्पिटलसाठी दहा कोटी रुपयांची देणगी उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा केली. तसेच भूमिपूजन प्रसंगी एक कोटी रुपयांचा धनादेश देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. शताब्दी वर्षानिमित्त शहर व परिसरात तळेगाव जनरल हॉस्पिटलमधून सेवा दिलेल्या व सध्या सेवा देत असलेल्या नामवंत ५०० डॉक्टरांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस संस्थेचे अध्यक्ष गणेश खांडगे यांनी स्वागत केले, तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक चिटणीस शैलेश शहा यांनी केले. चंद्रभान खळदे यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमास मावळ तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेले अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.