प्रभात वृत्तसेवा वडगाव मावळ – वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी मतदान प्रक्रिया दि. २ डिसेंबर रोजी शांततेत पार पडली असून, राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतमोजणी रविवारी (दि. २१) सकाळी १० वाजता होणार आहे. मतमोजणी वडगाव नगरपंचायत सभागृहात पार पडणार आहे.मतमोजणीसाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त तसेच प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असून, एकूण सात मतमोजणी टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक टेबलवर एक मतमोजणी पर्यवेक्षक, एक सहाय्यक व एक शिपाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे.ही मतमोजणी एकूण २४ मतदान केंद्रे आणि १७ प्रभागांसाठी करण्यात येणार असून, प्रभागनिहाय टेबलांची मांडणी करण्यात आली आहे. प्रत्येक टेबलवर संबंधित प्रभागातील मतदान केंद्रांचीच मतदान यंत्रे ठेवण्यात येणार आहेत. मतमोजणी चार फेऱ्यांमध्ये पूर्ण केली जाणार आहे. कोणत्या टेबलवर कोणत्या प्रभागाचे आणि मतदान केंद्राचे मशीन असेल, याची सविस्तर माहिती मतमोजणी कक्षात फलकाद्वारे लावण्यात आली आहे. मतमोजणीपूर्वी सकाळी ९.३० वाजता उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत स्ट्रॉंगरूम व्हिडिओ चित्रीकरण करत उघडण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी १० वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणी कक्षात केवळ नगराध्यक्ष व सदस्य उमेदवारांचे अधिकृत प्रतिनिधी यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. यापूर्वी निवडणूक विभागाकडे ज्यांची नावे सादर करण्यात आली असून ज्यांना ओळखपत्र देण्यात आले आहे, अशाच प्रतिनिधींना प्रवेश मिळणार आहे. ओळखपत्राशिवाय कोणालाही मतमोजणी कक्षात प्रवेश दिला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, मतमोजणीच्या अनुषंगाने शुक्रवारी (दि. १९) सकाळी ११ वाजता वडगाव नगरपंचायत कार्यालयात उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली असून, या बैठकीत आवश्यक सूचना देण्यात येणार आहेत. मतमोजणी प्रक्रियेबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता असून निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.