प्रभात वृत्तसेवा पिंपरी – गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ११ लाखांहून अधिक रकमेचा गुटखा नुकताच पकडला. शहरातील तरुणाईला अमली पदार्थांनंतर आता तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनाचा विळखा बसत चालला आहे. शाळा, महाविद्यालय आणि खासगी शिकवण्यांच्या १०० मीटर परिसरात गुटखा आणि सिगारेट विक्रीला सक्त मनाई असतानाही पिंपरी-चिंचवडमध्ये टपऱ्या, चहा स्टॉल्स आणि जनरल स्टोअर्सवर या वस्तू खुलेआम विकल्या जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. नियमांचं उल्लंघन करून विद्यार्थी नशेच्या आहारी जात असताना, अन्न-औषध प्रशासनाकडून कारवाईचा अभाव दिसतो.चिंचवड येथील पोदार शाळेच्या समोर १०० मीटरच्या आता गुटखा, मावा, सिगारेटची गुप्तपणे विक्री केली जाते. तसेच पिंपळे सौदागर, आकुर्डी, निगडी, भोसरी, वाकड या भागातील शाळा आणि महाविद्यालयांच्या बाहेरच टपऱ्यांवर गुटखा, सिगारेट आणि तंबाखूची विक्री सुरू असल्याचे आढळले. काही टपऱ्यांवर विद्यार्थ्यांची गर्दी दिसून येते. विशेष म्हणजे, पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी काही अनधिकृत कॅबिन कॅफे व पानटपऱ्यांवर कारवाई केली असली, तरी अनेक दुकानदारांनी दुकानांचे फलक बदलून पुन्हा विक्री सुरू केल्याचे दिसते. शाळा सुटल्यानंतर सायंकाळी विद्यार्थ्यांची खासगी शिकवण्यांकडे जाण्याची वेळच तंबाखू विक्रेत्यांसाठी ‘सुवर्णसंधी’ ठरते आहे. चहा स्टॉल्स, हातगाडे आणि पानटपऱ्यांवर विद्यार्थी सिगारेटचा धूर सोडताना दिसतात. काही ठिकाणी तर सिगारेटच्या जाहिरातींचे पोस्टरही लावलेले आढळले. पालकांच्या मते, शिकवण्यांच्या परिसरातही तंबाखूजन्य पदार्थांची विक्री रोखली नाही, तर मुलं लहान वयातच व्यसनाधीन होत चालली आहेत. नियम धुडकावले; प्रशासन ‘गप्प’ ‘कोटपा’ नियमांनुसार कोणत्याही शैक्षणिक संस्थेपासून १०० मीटर अंतरावर तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केल्यास फौजदारी गुन्हा नोंद होतो. मात्र, पिंपरी-चिंचवडमध्ये हा नियम कागदावरच राहिला आहे. अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि महानगरपालिका यांची समन्वयाने मोहीम सुरू होणं आवश्यक असताना, सध्या शासकीय यंत्रणा निष्क्रिय दिसतात. पालिका व पोलिसांनी काही ठिकाणी गुटखा विक्रेत्यांवर कारवाई केली असली तरी, त्याच भागातील किराणा दुकाने आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कानाडोळा केल्याने परिस्थिती जशीच्या तशी राहिली आहे. पालक व शिक्षकांचा पुढाकार काही शिक्षक आणि पालकांनीच या संदर्भात पोलिसांकडे तक्रारी केल्या आहेत. पूर्वी पिंपरी परिसरात शाळांलगतच्या पानटपऱ्यांविरुद्ध कारवाई झाल्यानंतर काही विक्रेते हटवले गेले होते. मात्र, त्याच रस्त्यांवर नव्या ठिकाणी पुन्हा स्टॉल उभे राहिल्याने पालक पुन्हा कारवाईची मागणी करत आहेत. ‘एफडीए’ आणि पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवावी तंबाकूजन्य पदार्थांची विक्री करणा-यावर तत्काळ फौजदारी कारवाई व्हावी, तसेच शाळा-कॉलेज परिसरात १०० मीटरच्या आत कोणतीही पानटपरी, चहाचा स्टॉल वा गुटखा विक्री होऊ नये, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पालकांच्या म्हणण्यानुसार, विद्यार्थ्यांसाठीचे परिसर व्यसनमुक्त राहिले पाहिजेत, अन्यथा भावी पिढी अंधकारात ढकलली जाईल. असा आहे नियम कोणत्याही शाळा किंवा महाविद्यालयापासून १०० मीटर अंतरात तंबाखूजन्य किंवा अमली पदार्थ विक्री करणे बेकायदेशीर आहे. हा नियम मोडल्यास फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो आणि न्यायालयीन शिक्षेची तरतूद आहे. पिंपरी, चिंचवड, निगडी आणि भोसरीतील अनेक शैक्षणिक संस्थांच्या जवळ विक्री सुरू असल्याचे पुरावे मिळाले आहेत. शहरातील तरुण पिढी नशेच्या जाळ्यात अडकत असताना, संबंधित विभागांनी तात्काळ कारवाई करणे अत्यावश्यक बनले आहे.