प्रभात वृत्तसेवा माथेरान – माथेरानचे सुपुत्र आणि स्वातंत्र्यलढ्यात मातृभूमीसाठी प्राणांची आहुती देणारे थोर क्रांतिकारक हुतात्मा भाई कोतवाल यांच्या ८६व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रम राष्ट्रप्रेमाच्या वातावरणात पार पडला. हुतात्मा भाई कोतवाल यांच्या बलिदानाची जाणीव नव्या पिढीपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने गेल्या अनेक वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबवला जात आहे. कार्यक्रमाची सुरुवात पहाटे मशाल फेरीने झाली. देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांच्या हस्ते पुण्यज्योत प्रज्वलित करण्यात आली. यावेळी हुतात्मा भाई कोतवाल यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी राहुल इंगळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच नगरसेवक सुनील शिंदे आणि ऐश्वर्या शिंदे यांच्या हस्ते स्वातंत्र्यसैनिक स्तंभास पुष्पहार अर्पण करून स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करण्यात आले.वीर हुतात्मा भाई कोतवाल नगरपरिषद प्राथमिक शाळेत कै. सुभेदार विनय धनावडे यांच्या शिल्पास नगरसेविका प्रतिभा घावरे व सुरेखा साळुंखे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. भाई कोतवाल यांच्या निवासस्थानी पवन कोतवाल यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच हुतात्मा भाई कोतवाल व हुतात्मा हिराजी पाटील यांच्या प्रतिमांना नगरसेविका अर्चना आदित्य भील्लारे व कमल गायकवाड यांनी अभिवादन केले.स्वातंत्र्यसैनिक नामफलकास नगरसेविका लता ढेबे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. हुतात्मा स्मारक येथे नगरसेवक सोहेल महापोळे आणि नगरसेविका रिजवाना शेख यांच्या हस्ते शिल्पास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.