प्रभात वृत्तसेवा खालापूर – रायगड जिल्हा शासकीय रुग्णालय, अलिबाग यांच्या परिचर्या प्रशिक्षण केंद्रातील ANM व GNM विद्यार्थिनींचे ग्रामीण आरोग्य अनुभव शिबीर सध्या लोहोप आरोग्य उपकेंद्रात सुरू असून, त्याचा एक भाग म्हणून वडगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांची सविस्तर आरोग्य तपासणी करण्यात आली. बुधवारी (दि. १०) झालेल्या या उपक्रमात BMIS तपासणी, सर्वसाधारण आरोग्य तपासणी आणि विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी विशेषतः आरोग्यदायी सवयी, स्वच्छतेचे महत्त्व, किशोरवयातील मुलांचे शारीरिक आणि मानसिक बदल आणि किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी स्वच्छता आणि व्यवस्थापन याविषयी विद्यार्थ्यांशी सविस्तर संवाद साधण्यात आला. या उपक्रमासाठी जिल्हा रुग्णालय रायगड अलिबागच्या अधिसेविका गायत्री म्हात्रे, परिचर्या प्रशिक्षण केंद्र जिल्हा रुग्णालय रायगड अलिबागच्या परिचर्या अधिकारी सारिका पाटील यांनी मोलाचे मार्गदर्शन केले असून याप्रसंगी पाठ्यनिर्देशिका धनश्री पाटील, जि.प.प्राथमिक शाळा मुख्याध्यापक सुभाष राठोड व इतर शिक्षक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते. जीएनएम तृतीय वर्षांच्या विद्यार्थिनींनीही मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैजनाथ जाधव यांनी केले, प्रास्ताविक सुभाष राठोड यांनी तर आभार धायगुडे यांनी मानले.