मावळात ७९ पैकी २ उमेदवारांचे अर्ज अवैध; जिल्हा परिषद, पंचायत समितीचे ७७ अर्ज छाननीत वैध. Pune ZP Election 2026 – तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी दाखल झालेल्या ७९ उमेदवारी अर्जांपैकी २ अर्ज अवैध ठरवण्यात आले आहेत. तर उर्वरित ७७ अर्ज छाननीत वैध ठरले आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेचे २७ तर पंचायत समितीचे ५० उमेदवारी अर्ज वैध ठरल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विक्रम देशमुख यांनी दिली. मावळ तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ५ जागांसाठी २७ उमेदवारांनी एकूण ३५ अर्ज दाखल केले होते, तर पंचायत समितीच्या १० जागांसाठी ५२ उमेदवारांनी ६९ अर्ज सादर केले होते. अशा एकूण १०४ अर्जांची छाननी करण्यात आली, त्यापैकी २ अर्ज अवैध ठरवण्यात आले. पंचायत समितीच्या काले गणातील शिवसेना (उबाठा) यांच्या उमेदवार शहनाज संतोष कुंभार यांचे मतदार यादीत नाव नसल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला. तसेच वराळे गणातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार शिंदे अनंता बबन यांच्या उमेदवारी अर्जावर सूचकाची स्वाक्षरी नसल्याने त्यांचा अर्जही अवैध ठरवण्यात आला आहे.गुरुवारी (दि. २२) उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली. या दरम्यान विविध उमेदवारांच्या अर्जांवर हरकती घेण्यात आल्या होत्या. मात्र, इंदोरी गटातील भाजप उमेदवार मेघा भागवत यांच्या शपथपत्रावर अभिसाक्ष नसल्याची, कुसगाव बुद्रुक गटातील भाजप उमेदवार दत्तात्रय गुंड यांच्या अर्जावर निरंक केल्याची, सोमाटणे गणातील भाजप उमेदवार बाळासाहेब पारखी यांनी गुन्ह्याची माहिती सादर न केल्याची, सुभाष धामणकर आणि काले गणातील राष्ट्रवादीच्या शैला कालेकर यांनी घराचे मूल्यांकन न दिल्याची, कार्ला गणातील शिवसेना (उबाठा) उमेदवार अश्विनी भेगडे व नाणे गणातील भाजप उमेदवार संगीता आढारी यांच्या अर्जावरील किरकोळ हरकती तसेच चांदखेड गणातील राष्ट्रवादीच्या सुनीता येवले यांच्या अर्जावर मालमत्ता लपवल्याबाबत घेतलेली हरकत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सुनावणीनंतर फेटाळली.