पिंपरी – महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) च्या वतीने भव्य प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. भोईरनगर येथील जयवंत प्राथमिक शाळेच्या मैदानावर पार पडलेल्या या सभेत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी आक्रमक शैलीत भाजपवर जोरदार टीका केली. या सभेस प्रभाग क्रमांक १७ मधील अधिकृत उमेदवार मनिषा आरसूळ, भाऊसाहेब भोईर, शोभा वाल्हेकर आणि शेखर चिंचवडे उपस्थित होते. शशिकांत शिंदे म्हणाले, पिंपरी चिंचवड शहराचा विकास फक्त राष्ट्रवादी काँग्रेसनेच केला. येथील स्वच्छ रस्ते, राजीव गांधी आयटी पार्क असे अनेक कामे केली आहेत. त्याचबरोबर अनेक रिकाम्या हातांना रोजगार दिला. भाजपने सुसंस्कृत असल्याचे ढोंग करू नये. सरकारमधील सर्व यंत्रणा आपल्याच बापाच्या असल्यासारख्या वापरल्या जात आहेत. ठरवून, प्लॅन करून विरोधकांवर दबाव टाकण्याचे राजकारण सुरू आहे. पण पिंपरी-चिंचवडची जनता हुशार आहे, ती हे सर्व ओळखते. ज्या पक्षाने शिस्तीचे धडे दिले, त्या पक्षातच आता शिस्त राहिलेली नाही. जर शिस्तच उरली नसेल, तर आरएसएसच्या प्रमुखांनी त्यांचे कान टोचावेत. भाऊसाहेब भोईर म्हणाले, प्रभाग क्रमांक १७ मध्ये हिंदू-मुस्लिम सर्व समाजातील नागरिक गुण्यागोविंदाने एकत्र राहत असून येथे कधीही धर्माच्या नावावर भेदभाव करण्यात आलेला नाही. सर्वधर्मसमभाव आणि एकतेच्या विचारावर विश्वास ठेवूनच या प्रभागाचा विकास करण्यात आला आहे. आम्ही सत्तेत असताना सर्व समाजांना सोबत घेऊन अनेक लोकहिताची आणि समाजहिताची कामे प्रामाणिकपणे राबवली असून, पुढील काळातही हाच समन्वय, सलोखा आणि विकासाचा विचार पुढे नेण्याचा आमचा निर्धार आहे. ही निवडणूक केवळ उमेदवारांची नाही, तर आपल्या स्वाभिमानाची आहे. दबाव, धमकी आणि अहंकाराच्या राजकारणाला उत्तर देण्याची वेळ आली आहे. प्रभाग १७ चा सर्वांगीण विकास हवा असेल, आपल्या एका मताने पिंपरी-चिंचवडचे भविष्य ठरवा!”