पिंपरी : पिंपरी–चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १६ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या पदयात्रेला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. पॅनल प्रमुख मोरेश्वर भोंडवे यांच्यासह चारही उमेदवारांनी काढलेली पदयात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या नागरिकांच्या गर्दीमुळे संपूर्ण प्रभागात राष्ट्रवादीमय वातावरण निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. या वेळी प्रभाग १६ चे पॅनेल प्रमुख व सर्वसाधारण गट ‘ड’ चे उमेदवार मोरेश्वर भोंडवे, नागरिकांचा मागास प्रवर्ग ‘ब’ गटाच्या उमेदवार जयश्री भोंडवे, सर्वसाधारण महिला ‘क’ गटाच्या उमेदवार आशा भोंडवे, तसेच अनुसूचित जाती ‘अ’ गटाच्या उमेदवार श्रेया तरस–गायकवाड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही पदयात्रा रावेत बीआरटी रोडपासून सुरू होऊन म्हस्के वस्ती रोड, श्रीराम चौक, म्हस्के वस्ती चौक, चंद्रभागा कॉर्नर, एस. बी. पाटील रोड, शिंदे वस्ती परिसरातून मार्गक्रमण करत पुढे गेली. धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरणात सुरू झालेल्या या पदयात्रेत घोषणाबाजी, फटाक्यांची आतषबाजी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता राष्ट्रवादीची ताकद प्रकर्षाने दिसून आली. पदयात्रेत पोलीस पाटील दिवानजी भोंडवे, अक्षय तरस, राजू म्हस्के, अजित भोंडवे, बाळासाहेब सोनटक्के, गणेश सोनटक्के, कुणाल भोंडवे, गणेश भोंडवे, अशोक तरस, तानाजी भोंडवे, आकाश भोंडवे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नागरिकांनी रस्त्याच्या कडेला उभे राहून पदयात्रेचे जल्लोषात स्वागत केले. अनेक ठिकाणी घोषणा, टाळ्यांचा कडकडाट आणि फटाक्यांच्या आतषबाजीने परिसर दणाणून गेला. चारही गटांतील उमेदवारांनी एकत्रितपणे पदयात्रेत सहभाग घेत मतदारांशी थेट संवाद साधला. स्थानिक विकास, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, वाहतूक आणि नागरिकांच्या दैनंदिन समस्यांवर भर देत प्रचार करण्यात आला. कामाच्या जोरावरच मतदारांपर्यंत जात आहोत, अशी भावना उमेदवारांकडून व्यक्त होत होती. यावेळी बोलताना मोरेश्वर भोंडवे म्हणाले, माझ्यासह इतर तीनही उमेदवारांच्या प्रचारावेळी नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रेम, विश्वास आणि आशीर्वाद मिळत आहेत. नागरिकांचा हा प्रतिसाद पाहता विजय निश्चितच आपलाच आहे. प्रभाग क्रमांक १६ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदयात्रेला मिळालेला भरघोस प्रतिसाद आणि नागरिकांचा सहभाग पाहता निवडणुकीत राष्ट्रवादीचे पारडे जड असल्याचे चित्र सध्या तरी स्पष्टपणे दिसून येत आहे.