प्रभात वृत्तसेवा हिंजवडी – भाजपा शहर उपाध्यक्ष राम वाकडकर यांनी भाविकांसाठी आयोजित केलेल्या तीन दिवसीय श्रीकृष्णलीला मायरा कथेने भाविकांना मंत्रमुग्ध केले आहे. शहरात एवढ्या मोठ्या भव्य दिव्य नियोजनात सुरू झालेल्या कथा सोहळ्याला भाविकांचा जनसागर लोटला होता.नागरिकांचा प्रतिसाद व विश्व विख्यात आध्यात्मिक प्रवक्त्या तथा कथाकार जया किशोरी यांच्या सुमधुर अमृतवाणीतून कथेला सुरवात होताच अवघा वाकड परिसर अक्षरशः कृष्णमय झाला होता. सोमवार (दि.२४) पासून रोज सायंकाळी सुरू झालेल्या कथेला नागरिकांनी तीनही दिवस प्रचंड गर्दी केली होती. मुंबई बंगलोर महामार्गानजीक वाकड येथील मोकळ्या मैदानात कथेचा शुभारंभ मोठया उत्साहात करण्यात आला. भाजपाचे पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्ष राम वाकडकर यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून हा अद्वितीय भक्तिरसाचा सोहळा संपन्न होत आहे. कथेच्या शुभारंभ प्रसंगी मावळचे खासदार श्रीरंग बारणे, चिंचवडचे आमदार शंकर जगताप, भाजपा शहर अध्यक्ष शत्रुघ्न काटे, माजी खासदार अमर साबळे, माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते, रणजित कलाटे तसेच राम वाकडकर मित्र परिवारासह शहराच्या विविध भागातील भक्तगण मोठया संख्येने उपस्थित होते. जया किशोरी दीदींच्या कथेने यापूर्वी लाखो भक्तांच्या हृदयात कृष्णप्रेमाचा झरा वाहत आहे. मुख्य आयोजक राम वाकडकर यांच्यामुळे प्रामुख्याने वाकड, ताथवडे व पुनावळेतील भक्तांसाठी तीन दिवासीय कथा सोहळा प्रत्यक्ष अनुभवयाची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. कथेच्या पहिल्या दिवशी हजारो लोकांनी उपस्थित राहून, आनंद घेतला. यावेळी, अनेक भावीक भक्त कृष्ण भक्ती रसात तल्लीन झाले होते. माता-भिगिनींणी देवाच्या भक्तीत एकरूप होतं राधा कृष्णाच्या नामजपाने तालावर नाचत भाविकांनी अक्षरश: ठेका धरला होता. सार्वजनिक आरतीने कथेच्या पहिल्या व दुसऱ्या दिवसाचा समारोप करण्यात आला.