प्रभात वृत्तसेवा रावेत – रावेत–किवळे हा पिंपरी-चिंचवड महानगरातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारा आणि आयटी कर्मचाऱ्यांची मोठी वसाहत म्हणून ओळखला जाणारा परिसर आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या भागातील दैनंदिन प्रवास अत्यंत कठीण बनत चालला होता. विशेषतः समीर लॉन्स ते मुकाई चौक या महत्त्वाच्या सेवा रस्त्याची अत्यंत खराब अवस्था नागरिकांच्या नाराजीचे मुख्य कारण ठरत होती. याबाबत सामाजिक कार्यकर्ते बापू कातळे आणि स्थानिक रहिवाशांनी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे मागणी करताच रात्रीतून कामाला सुरुवात करण्यात आली. हा मार्ग पवना नदी परिसरापासून पुढे जाणारा आणि हजारो रहिवाशांचा दैनंदिन प्रवासाचा प्रमुख मार्ग आहे. आयटी पार्ककडे जाणारे कर्मचारी, शाळा-कॉलेज विद्यार्थी तसेच स्थानिक व्यावसायिक यांची सततची वर्दळ या रस्त्यावर असते. खराब रस्त्यामुळे वाढलेली वाहतूक कोंडी, धूळ आणि अपघातांचा धोका यामुळे नागरिकांचा संताप वाढत होता. या परिस्थितीची गंभीर दखल घेत सामाजिक कार्यकर्ते बापू कातळे यांनी रहिवाशांच्या वतीने भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI) यांच्याकडे निवेदन देत तात्काळ दुरुस्तीची मागणी केली होती. या निवेदनाची तात्काळ दखल घेत प्राधिकरण ने रावेत–किवळे हद्दीतील सेवा रस्त्याच्या सुधारणा कामांना वेग दिला आहे. सध्या राष्ट्रीय महामार्ग विभागाने हाती घेतलेल्या पहिल्या टप्प्यात पवना नदी ते समीर लॉन्सपर्यंत डांबरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात समीर लॉन्स ते मुकाई चौक या सर्वाधिक दुरवस्थेत असलेल्या भागात काम जलदगतीने सुरू होणार आहे. तसेच, पिंपरी–चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील 12 मीटरचा डीपी रोड राष्ट्रीय महामार्ग विभागाने स्वीकारला असून त्याच्या भूसंपादन प्रक्रियेला पीसीएमसी प्रशासनाकडून वेग आला आहे. भूसंपादन पूर्ण झाल्यानंतर या रस्त्याचे उच्च दर्जाचे काँक्रीटीकरण होणार असल्याने या परिसराला टिकाऊ व सक्षम रस्त्यांचे मोठे समाधान मिळणार आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या माहितीनुसार, काँक्रीटीकरणाची कामे लवकरच प्रत्यक्ष सुरू होणार आहेत. कामाच्या दरम्यान काही काळ वाहतुकीत अडथळे येऊ शकतात; मात्र काम पूर्ण झाल्यानंतर या परिसरातील रहिवाशांना वाहतुकीचा मोठा दिलासा मिळणार आहे. प्रशासनाने नागरिकांना या काळात थोडे संयम आणि सहकार्याची विनंती केली आहे. लवकरच हा मार्ग अधिक सुरक्षित, मजबूत आणि प्रवासासाठी सुकर होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.दरम्यान, बापू कातळे यांनी नागरिकांच्या भावना समजून घेत तात्काळ पावले उचलल्याबद्दल राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकारी विभागाचे मनःपूर्वक आभार नागरिकांच्या वतीने व्यक्त केले. त्यांच्या पाठपुराव्यामुळे या महत्त्वाच्या कामाला अपेक्षित गती मिळताना दिसत आहे. “सध्या सेवा रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे आम्ही निश्चितच स्वागत करतो. मात्र भविष्यातील वाढती लोकसंख्या आणि या मार्गावरील वाढता वाहतुकीचा ताण लक्षात घेता हा रस्ता सिमेंट काँक्रीटचा करणं अत्यावश्यक आहे.तसेच पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या टाळण्यासाठी निचरा व्यवस्थेची पाइपलाइन आधीच बसविणे गरजेचे आहे. या सर्व बाबींवर आमची अधिकाऱ्यांसोबत अत्यंत सकारात्मक चर्चा झाली असून त्यांनी सुचविलेल्या उपायांची अंमलबजावणी करण्याची स्पष्ट हमी दिली आहे.” – बापू कातळे अध्यक्ष संस्थापक संकल्प सोशल फाउंडेशन