Pimpri News: महापालिकेमध्ये भाजपची एकहाती सत्ता आली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विरोधी बाकावर बसावे लागणार आहे. भाजपाने महापौर, स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे. असे असताना भाजपाच्या चुकीच्या निर्णयावर कडाडून विरोध करण्यासाठी सभागृहात आक्रमक नेत्याची विरोधी पक्षनेतेपदी वर्णी लावण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठांनी शोध सुरू केला आहे. तर शहरातील अनेक दिग्गजांनी यासाठी फिल्डींग लावण्यास सुरूवात केली आहे. शहरामध्ये भाजपाने ८५ जागांवर यश मिळवले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गतवेळच्या ३६ जागा राखण्यात यश मिळाले आहे. निवडणुकीच्या प्रचारामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपच्या सत्ताकाळात मोठे भ्रष्टाचार झाले असल्याचे आरोप केले होते. आता भाजपची एकहाती सत्ता आली असून भाजपच्या चुकीच्या निर्णयांविरोधात राष्ट्रवादीला ठाम भूमिका घ्यावी लागणार आहे. तसेच सभागृहामध्ये बहुमताच्या जोरावर विषय मंजूर करत असताना विरोधकांची मोट बांधून चुकीच्या गोष्टींना विरोध करावा लागणार आहे. त्यासाठी आक्रमक भूमिका घेणाऱ्या नगरसेवकाच्या गळ्यात विरोधी पक्षनेत्याची माळ पडणे आवश्यक आहे. शहरातून ज्येष्ठ नगरसेवक म्हणून भाऊसाहेब भोईर यांचा चेहरा आहे. ते अभ्यासू असून त्यांना प्रदीर्घ राजकारणाचा अनुभव आहे. तर दुसरीकडे नवीन मात्र, आक्रमक असलेल्या विकास साने यांच्या नावाची देखील चर्चा आहे. विरोधी पक्षनेते पदाचा अनुभव असलेले नाना काटे देखील रेसमध्ये आहेत. तर शहराध्यक्ष योगेश बहल यांना प्रदीर्घ राजकारणाचा अनुभव असल्याने त्यांना देखील संधी मिळण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पंकज भालेकर, राहुल भोसले, डब्बू आसवाणी यांनी देखील जोर लावला आहे. मावळ लोकसभा लढविण्यास इच्छुक असलेले संदीप वाघेरे आक्रमक आहेत. त्यांनी भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश करत संपूर्ण पॅनल निवडून आणला आहे. भाजपमध्ये असताना त्यांनी भाजपच्याच अनेक निर्णयांना विरोध केला होता. त्यामुळे त्यांच्याही गळ्यात विरोधी पक्षनेत्याची माळ पडू शकते. रणरागिनीही मैदानात सभागृहातील अनेक वर्षांचा अनुभव असलेल्या वैशाली काळभोर, स्वाती काटे, वैशाली घोडेकर या देखील मैदानात आहेत. तर थेरगावमधून निवडून आलेल्या माया बारणे यांनी देखील विरोधी पक्षनेते पदासाठी फिल्डींग लावली आहे.