प्रभात वृत्तसेवा पिंपरी – महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने निगडी ते दापोडी अशी १००० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी बीआरटी मार्ग संपूर्ण खोदून ठेवण्यात आला आहे. काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित ठेकेदाराकडून रस्त्याची दुरुस्ती केली जात नसल्याने वाहतुकीचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. तर, धोकादायक पद्धतीने बुजवलेल्या मार्गावर मोठ्या प्रमाणावर अपघात होत आहेत. महापालिका प्रशासनाच्या सुचनेनुसार महामार्गावर वाहतुकीला अडथळा होऊ नये, यासाठी जलवाहिनीचे खोदकाम रात्रीच्या वेळेत केले आहे. रात्री खोदकाम करून जलवाहिनी टाकली जात असली, तरी काम पूर्ण झाल्यानंतर त्या खड्ड्यांवर तातडीने डांबरीकरण न करता केवळ मुरूम टाकून काम उरकले जात आहे. परिणामी दिवसा वाहनांची वर्दळ सुरू होताच मोठ्या प्रमाणावर धूळ उडते. निगडीपासून सुरू झालेले हे काम आता पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत आले आहे. या चौकामधून पिंपरी कॅम्प, भोसरी या मुख्य बाजारापेठेकडे रस्ता जातो. तर पिंपरी चिंचवड महापालिका भवन याठिकाणी असल्याने या चौकात मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. रात्री रस्ता खोदल्यानंतर वाहिनी टाकण्याचे काम पूर्ण केले जाते. खोदलेल्या चरामध्ये मुरुम व राडारोडा टाकून जलवाहिनी गाडली जाते. त्यानंतर त्यावर बारीक खडी व कच टाकली जाते. त्यावरून दुचाकी घसरून अनेक अपघात झाले आहेत. या अपघातांची मालिका सुरू असतानाही संबंधित ठेकेदाराला अभय दिले जात असल्याने नागरिकांमध्ये रोष आहे. जलवाहिनी गाडण्यासठी टाकलेला मुरूम वाहनांच्या रहदारीमुळे धुलीकणांच्या माध्यमातून हवेत उडतो. त्यामुळे परिसरातील हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात घसरत आहे. परिणामी श्वसनाचे आजार, डोळ्यांची जळजळ, घशात कोरडेपणा आणि खोकला यांसारख्या तक्रारी नागरिकांमध्ये वाढत आहेत. या मार्गावरून दररोज प्रवास करणारे नागरिक, चाकरमानी आणि विद्यार्थ्यांनाही या प्रदूषणाचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. खडी टाकलेल्या खड्ड्यांमुळे रस्ता निसरडा बनला असून दुचाकीस्वारांना आपले वाहन सांभाळणे कठीण जात आहे. अनेक ठिकाणी दुचाकी घसरून अपघात या ठिकाणी होत आहेत. गंभीर अपघात होण्याची महापालिका प्रशासन वाट पाहत आहे का असा संतप्त सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे. अवजड वाहनांमुळे धोका अधिक पुणे-मुंबई महामार्ग हा शहरातील प्रमुख रस्ता असल्याने या मार्गावरून सातत्याने अवजड वाहने, ट्रक आणि बसची वाहतूक सुरू असते. मुरूम टाकलेल्या रस्त्यावरून ही अवजड वाहने जात असताना धुळीचे ढग निर्माण होतात. यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता अधिक बळावते. एखादी गंभीर दुर्घटना घडल्यावरच प्रशासन जागे होणार का, असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. जलवाहिनीसाठी ५२ कोटी ४२ लाखांचा खर्च निगडी ते दापोडी अशी एकूण १३ किलोमीटर अंतराची भूमिगत जलवाहिनी टाकण्यात येत आहे. कामाची मुदत दीड वर्षे आहे. त्यासाठी ५२ कोटी ४२ लाख रूपयांचा खर्च करण्यात येणार आहे. हे काम मे. गुडविल कन्स्ट्रक्शन या ठेकेदारी कंपनीला देण्यात आले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर निगडी ते दापोडी मार्गावरील सर्व गृहप्रकल्प आणि शेवटचे टोक असलेल्या दापोडी व सांगवी भागांत पुरेसा प्रमाणात पाणी उपलब्ध होईल, असा दावा अधिकार्यांनी केला आहे. मात्र, ठेकेदाराच्या निकृष्ठ कामामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.