प्रभात वृत्तसेवा पिंपरी – ताथवडे येथील इंदिरा विद्यापीठात शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वाचा कार्यक्रम पार पडला. इंदिरा विद्यापीठाच्या ओपनिंग हॉरिझोन्स थीमवर आधारित प्रवेश मोहिमेचे उद्घाटन, नवीन एसइओ-ऑप्टिमाइज्ड वेबसाइटचे लाँचिंग आणि तब्बल ४१५ विद्यार्थ्यांना ४.१५ कोटी रुपयांच्या शिष्यवृत्तीचे वितरण केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यापीठाच्या अध्यक्षा तथा मुख्य मार्गदर्शिका डॉ. तरिता शंकर, शैक्षणिक सल्लागार व मुख्य विपणन अधिकारी प्रो. चेतन वाकलकर, कुलगुरू डॉ. अनघा जोशी, डॉ. पुनम भोयर, मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी गिरीश पारेख, कार्यकारी संचालक शार्दुल गांगल, विश्वस्त साहिल तरिता शंकर, रजिस्ट्रार डॉ. प्रवीण पाटील, सर्व प्राध्यापकवृंद व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमात मार्गदर्शन करताना मंत्री आठवले म्हणाले की, इंदिरा विद्यापीठाचे कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शैक्षणिक आदर्शाशी साधर्म्य राखणारे आहे. त्यामुळेच दुबईमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात इंदिरा विद्यापीठाची शिफारस करण्याचा विचार आहे. पुढे ते म्हणाले की, शिक्षण हे केवळ नोकरी मिळवण्याचे साधन नसून सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. संविधान, सामाजिक समता, विकसित भारत या विषयांवर त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. सुरुवातीलाच त्यांनी इंग्रजी यमक जुळवत चक्क एक तास इंग्रजीत भाषण करून विद्यार्थ्यांना भुरळ घातली.इंदिरा विद्यापीठाने गुणवत्ता आधारित, महिला विद्यार्थिनींसाठी, दिव्यांगांसाठी, आर्थिक दुर्बल घटकांसाठी, खेळाडूंसाठी, शहीदांच्या वारसांसाठी, तसेच पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी अशा सात प्रकारच्या शिष्यवृत्ती सुरू केल्या आहेत. यापैकी प्राथमिक वाटप सोहळ्यात अनेक विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली. कार्यक्रमात मंत्री आठवले यांनी भारताच्या प्रगतीचा उल्लेख करत, भारत जगात चौथ्या क्रमांकावरून पहिल्या स्थानावर पोहोचेल, असे भाकीतही व्यक्त केले. इंदिरा विद्यापीठाच्या उपक्रमांचे उपस्थितांनी कौतुक केले. या शिष्यवृत्तीमुळे शेकडो विद्यार्थ्यांना मोठा शैक्षणिक दिलासा मिळणार आहे.