पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मतदानादरम्यान थेरगाव येथील प्रभाग क्रमांक २३ मध्ये ईव्हीएम मशीन बंद पडल्याने मतदान प्रक्रिया विस्कळीत झाली आहे. यशवंतराव चव्हाण शाळेतील मतदान केंद्रात खोली क्रमांक ८ आणि ९ मधील ईव्हीएम यंत्रणा मागील एक तासापासून बंद असल्याने मतदारांची मोठी गैरसोय होत आहे. यशवंतराव चव्हाण शाळेतील बूथ क्रमांक २४ येथे ईव्हीएम मशीन अचानक बंद पडल्यामुळे मतदान काही काळासाठी पूर्णपणे थांबवावे लागले. या घटनेमुळे मतदान केंद्राबाहेर शेकडो मतदार रांगेत उभे असून नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि कामावर जाणाऱ्या मतदारांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान, मतदान प्रक्रियेतील अडथळ्यामुळे मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून निवडणूक प्रशासनाने तातडीची उपाययोजना करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.