१५ दिवसांपासून रस्ता बंद, नागरिक त्रस्त निगडी – अंकुश चौक ते श्रीकृष्ण मंदिर मार्गावर भूसुरुंगासारखे खड्डे खोदून ठेवत ठेकेदारांनी रस्ता खोळंबून टाकला आहे. गेल्या १५ दिवसांपासून हा मार्ग पूर्णपणे बंद आहे. परिणामी नागरिक, वाहनचालक आणि दुकानदार त्रस्त झाले आहेत. याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी तरुणाची दुचाकीसह खड्ड्यात पडून जखमी होण्याची गंभीर घटना घडल्याने स्थानिकांच्या नाराजीचे प्रमाण अधिक वाढले आहे. निगडी-पिंपरी मेट्रो प्रकल्पांतर्गत काम करणाऱ्या ठेकेदारांनी रस्त्यावर सलग तीन मोठे खड्डे खोदून ठेवले आहेत. या ठिकाणी कुठलाही दिशादर्शक फलक नसून सुरक्षा रक्षकांची गैरहजेरी असते. आणि रात्रीच्या वेळी प्रकाशव्यवस्था अपुरी असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता कायम असते. भाजपचे सचिन काळभोर यांनी सांगितले की, महानगरपालिका आयुक्तांनी स्वतः या ठिकाणी पाहणी करून ठेकेदारांवर तातडीने कारवाई करावी. नागरिकांसाठी हा मार्ग त्वरित खुला करण्यात यावा, अशीही मागणी त्यांनी केली आहे. तसेच, पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी हा रस्ता कामासाठी ताब्यात घेतल्याने महापालिका कारवाई होत नसल्याचेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, वाढत्या अपघातांच्या घटनांचा विचार करता स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून सुरक्षिततेची योग्य व्यवस्था करावी, अशी जोरदार मागणी केली आहे.