Pimpri Chinchwad Water Supply – पिंपरी-चिंचवड शहराची पाणीटंचाई दूर करण्यासाठी राज्य सरकारने अत्यंत सकारात्मक पाऊल उचलले आहे. पवना धरणातून १०० ‘एमएलडी’ अतिरिक्त पाणीसाठा उचलण्यास येत्या १५ दिवसांत परवानगी दिली जाईल, असे आश्वासन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले असल्याची माहिती आमदार शंकर जगताप यांनी दिली. बुधवारी विधानसभेत या प्रश्नावर आमदार जगताप यांनी आग्रही भूमिका घेत अर्धा तास चर्चा केली. राज्याच्या विधीमंडळ अधिवेशना दरम्यान पिंपरी-चिंचवड शहराच्या पाणी प्रश्नावर बुधवारी महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी पवना धरणातून १०० ‘एमएलडी’ अतिरिक्त पाणीसाठा उचलण्याबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय भामा आसखेडचे अतिरिक्त पाणी , मावळ तालुक्यातील मौजे शिरे येथील ०. ९५ हेक्टर जमीन जलसंपदा विभागाकडून कायमस्वरूपी हस्तांतरित करण्याबाबत आदेश दिलेले आहे. या सर्व निर्णयामुळे शहरातील नागरिकांना उन्हाळ्यातील पाणीटंचाईपासून मोठा दिलासा मिळणार असल्याचे आमदार जगताप यांनी सांगितले. या बैठकीला कार्यकारी संचालक हनुमंत धुमाळ, मुख्य अभियंता रा. अ. कायलवार, अधीक्षक अभियंता पृथ्वीराज फाळके, नगर विकास विभागाचे अवर सचिव शिवाजी चव्हाण, पिंपरी चिंचवड महापालिका अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, पाणी पुरवठा सह शहर अभियंता अजय सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता महेश बरदे उपस्थित होते. पवना धरण आमदार शंकर जगताप याबाबत म्हणाले, शहरात दरवर्षी ८.३८ टीएमसी पाणी (६५० एमएलडी) वापरले जाते. शहराची आजमीतिला लोकसंख्या ३७ लाखांच्या उंबरठ्यावर आहे. सध्या दिवसाआड पाणी वाटपाचे नियोजन शहरांमध्ये राबवले जाते. त्यामुळे उपलब्ध पाणीपुरवठा संदर्भात जलसंपदा विभागाकडे पवना धरणातून १०० एमएलडी अतिरिक्त पाणीपुरवठा करण्याची मागणी केली होती. या संदर्भात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीमध्ये शहराची पाण्याची आवश्यकता आणि वितरित होणारा पाणीपुरवठा याच्या तुलनात्मक अभ्यासानंतर जलसंपदा मंत्री विखे पाटलांनी पवना धरणातून १०० एमएलडी अतिरिक्त पाणी उचलण्याची परवानगी दिली आहे. आमदार शंकर जगताप यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात आंद्रा धरणाचे पाणी शहरात आणण्यासाठी मावळ तालुक्यातील मौजे शिरे येथील ०.९५ हेक्टर जमीन जलसंपदा विभागाकडून कायमस्वरूपी हस्तांतरित करण्याबाबत १३ मार्च २०२६ रोजी आदेश दिलेले आहे. या ठिकाणी जॅकवेल, अप्रोच चॅनेल, पंप हाऊस आणि सबस्टेशन उभारले जाणार आहे. यामुळे आंद्राचे पाणी थेट शहरात पोहोचवण्यातील अडथळे दूर होतील. या सुधारणांमुळे पिंपरी चिंचवड शहराला अतिरिक्त पाणी मिळण्याबाबतच्या तांत्रिक अडचणी दूर होणार आहेत. आजच्या बैठकीत मौजे शिरे येथील जागा, शुद्ध पाण्यासाठी बॅरेज पद्धतीचा बंधारा बांधण्याची सभागृहात केलेली मागणी कायम करण्यात आली आहे .