पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज शहरात मतदान प्रक्रिया सुरू असून सकाळपासूनच विविध मतदान केंद्रांवर मतदारांनी हजेरी लावली आहे. सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत ६.५६ टक्के मतदान झाले होते. दुपारनंतर मतदानाचा वेग वाढत असून दुपारी १.३० वाजेपर्यंत एकूण २८.१५ टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दुपारपर्यंत झालेल्या मतदानात २ लाख ७१ हजार २८२ पुरुष, २ लाख ११ हजार २४९ महिला तसेच ६ इतर मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. एकूण ४ लाख ८२ हजार ५३७ मतदारांनी दुपारी १.३० वाजेपर्यंत मतदान केले आहे. सकाळच्या तुलनेत दुपारच्या सत्रात मतदान केंद्रांवर गर्दी वाढल्याचे चित्र दिसून आले. कामकाजाचा दिवस असतानाही मतदारांचा उत्साह दिसून येत असून संध्याकाळच्या टप्प्यात मतदानाचा टक्का आणखी वाढण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे. शहरातील सर्व मतदान केंद्रांवर शांततेत आणि सुरळीत मतदान प्रक्रिया सुरू असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहन निवडणूक प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.