Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवड शहर २०१४ पासून भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाते. मात्र नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत भाजपच्या अनेक दिग्गज नगरसेवकांना पराभवाचा सामना करावा लागल्याने शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. हा पराभव जनतेचा स्पष्ट कौल होता, की पक्षांतर्गत राजकीय गणितातून घडवून आणलेला ‘गेम’, यावर आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या निवडणुकीत भाजपचे वजनदार चेहरे म्हणून ओळखले जाणारे विलास मडिगेरी, नामदेव ढाके, माई ढोरे, सुजाता पालांडे, ॲड. मोरेश्वर शेडगे, सचिन चिंचवडे आणि जयश्री गावडे यांना पराभव स्वीकारावा लागला. हे सर्व नेते शहरातील भाजपच्या निर्णयप्रक्रियेत प्रभावी मानले जात होते. माई ढोरे या माजी महापौर राहिल्या आहेत तर विलास मडिगेरी हे स्थायी समितीचे माजी सभापती आहेत. त्यांनी आपल्या प्रभाग क्रमांक आठमध्ये मोठमोठी विकासकामेही केली आहेत. तसेच नामदेव ढाके यांनी गेल्या पंचवार्षिक काळात सत्तारूढ पक्षनेते म्हणून जबाबदारी सांभाळली होती. त्यांच्या याच प्रभाग क्रमांक १७ मधून निवडून आलेल्या सचिन चिंचवडे यांना उपमहापौरपदाचा मान मिळाला होता. संत तुकारामनगरमधून निवडून आलेल्या सुजाता पालांडे यांच्याकडे भाजप महिला शहराध्यक्षपदाची धुरा होती. ॲड. मोरेश्वर शेडगे यांनी मागील कार्यकाळात आपले राजकीय वजन वापरून स्वीकृत नगरसेवकपद मिळवले होते; यंदा ते प्रभाग क्रमांक १८ मधून थेट निवडणूक रिंगणात उतरले. मुख्यमंत्री कार्यालयाशी जवळीक असलेले नेते म्हणून त्यांची ओळख आहे. तर अनेक वर्ष नगरसेविका राहिलेल्या जयश्री गावडे या प्रभाग क्रमांक १९ मधून निवडणुकीत होत्या; फेर मतमोजणीत अवघ्या २० मतांनी त्यांचा पराभव झाला. मागील काही महिन्यांपूर्वी त्यांच्या घराबाबत काही वाद निर्माण झाला होता. भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवडमध्ये यंदा पक्षाला बहुमत जरी मिळाले असले, तरी दिग्गज नेत्यांचा पराभव हा पक्षासाठी आत्मपरीक्षणाचा इशारा मानला जात आहे. हा निकाल जनतेचा स्पष्ट संदेश आहे की राजकीय डावपेचांचा परिणाम, हे येत्या काळात स्पष्ट होईल. मात्र सध्या तरी शहराच्या राजकारणात एकच प्रश्न चर्चेत आहे, हा पराभव खरोखर मतदारांचा कौल, की दिग्गजांचा नियोजित राजकीय ‘गेम’? रोखण्याची रणनीती? या पार्श्वभूमीवर एकाच वेळी इतक्या दिग्गजांचा पराभव होणे केवळ योगायोग मानावा का, असा सवाल उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे काही प्रभागांमध्ये भाजपचे तीन नगरसेवक निवडून आले असताना, त्याच प्रभागातील ‘दिग्गज’ मात्र पराभूत झाल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे मतदारांचा रोष होता, की अंतर्गत गटबाजीने समीकरणे बदलली, याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत. शहरातील राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात अशीही चर्चा आहे की, या नेत्यांचा विजय झाला असता ते महापौर, सभागृह नेता, स्थायी समिती सभापती किंवा पक्षातील मोठ्या पदांचे ठोस दावेदार ठरले असते. त्यामुळेच काही स्थानिक नेत्यांनी आपले राजकीय गणित साधत दिग्गजांना रोखण्याची रणनीती आखली का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.