पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी आचारसंहिता लागली आहे. निवडणूक जाहीर होताच या पक्षातून त्या पक्षात उड्या मारत पक्षांतराचे प्रमाण वाढले आहे. निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्यासाठी इच्छुकांची झुंबड उडाली आहे. मंगळवारी (दि. १६) सकाळीच अजित पवार यांनी भाजप आणि शिवसेनेला धक्का देत काही प्रवेश करून घेतले. तर पिंपरीमधील माजी महापौरांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी गेल्या आठवड्यात पुणे विमानतळावर पहाटे तीन वाजता शहरातील पदाधिकाऱ्यांसोबत अजित पवार यांची भेट घेतली होती. या भेटीत पक्षप्रवेशाला हिरवा कंदील मिळेल असे अपेक्षित होते. मात्र, अजितदादांना भल्या पहाटेच्या थंडीत भेटायला गेलेल्या पदाधिकाऱ्यांवर जाळ काढला. एवढ्या रात्री काय आहे?, नंतर नसतं का भेटता आलं?. तुमच तर मला काहीच कळत नाही या शब्दात खरडपट्टी केली. दुसरीकडे यांच्या पक्षप्रवेशाला राष्ट्रवादीतून देखील काहींनी विरोध केला. पक्षप्रवेश होत नाही हे लक्षात येताच त्यांनी आता भाजपकडे मोर्चा वळवला असून येत्या दोन दिवसांत भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता आहे. मात्र, यामुळे भाजपमधील निष्ठावंतांचे धाबे दणाणले आहेत. पिंपरीमधीलच गाववाले असलेले माजी नगरसेवक या प्रवेशामुळे नाराज झाले आहेत. याबाबत त्यांना पक्षश्रेष्ठींकडून तुम्हाला पॅनल प्रमुख करतो असे आश्वासन दिले आहे. मात्र, त्याला नकार देत त्यांनी थेट पक्ष सोडण्याची भूमिका परखडपणे मांडली आहे. त्यामुळे आगामी काळात हा संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे.