प्रभात वृत्तसेवा पिंपरी- चुकीच्या पद्धतीने उघडलेल्या टेम्पोच्या दरवाजाला धडकून, त्यानंतर मागून येणाऱ्या ट्रकने चिरडले. दोन वाहन चालकांच्या निष्काळजीपणामुळे एका १९ वर्षीय तरुणाचा अपघाती मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. २) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास विठ्ठल-रुक्मिणी मंदिराजवळील त्रिवेणी नगर चौकात निगडी येथे घडली. निलेश मॅनुजी प्रधान (वय ३२, रा. राजनगर, ओटास्किम, निगडी. टाटा झिप टेम्पो चालक) आणि बाळासाहेब शंकरराव घोडके (वय ४५, रा. देवभूमी चौक, निगडी – आयशर ट्रक चालक) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपी चालकांचे नावे आहे. जलाल सलीम तांबोळी (वय ४२, रा. मिलिंदनगर, सोमेश्वर मंदिराजवळ, निगडी) यांनी बुधवारी (दि. ३) याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा पुतण्या जैद (वय १९) हा मंगळवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास इलेक्ट्रिक मोपेडवरून चहा आणण्यासाठी चालला होता. तो मिलिंदनगर येथील सोमेश्वर मंदिरासमोर आला असता टाटा झिप चालक आरोपीने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून टेम्पोचा दरवाजा अचानक उघडला. मोपेड दरवाजावर आदळून जैद खाली रस्त्यावर पडला. त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या आयशर ट्रकने त्याला चिरडले. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या जैद याचा मृत्यू झाला. निगडी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.