प्रभात वृत्तसेवा पिंपरी – भरधाव वेगातील कारने दुचाकीला समोरून दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार महिलेला गंभीर दुखापत होऊन तिचा मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी (दि. ८ जानेवारी) रोजी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास सांगवीतील राजीव गांधी पुलाजवळ घडला.मानसी मिलिंद वाडेकर (वय ४०) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. ॠषी किरण टंकसाळे (वय २१, रा. शुक्रवार पेठ, पुणे) असे आरोपी कार चालकाचे नाव आहे. मयत मानसी हिचा चुलत भाऊ अमेय नितीन वाडेकर (वय ३४, रा. इंद्रायणी कॉलनी, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे) यांनी शुक्रवारी (दि. ९) याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची चुलत बहिण मानसी या तळेगावहून शिवाजीनगरकडे आपल्या दुचाकीवरून चालल्या होत्या. त् या सांगवीतील राजीव गांधी पुलाजवळ आल्या असता समोरून आलेल्या आरोपीच्या कारने मानसी यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या मानसी यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास सांगवी पोलीस ठाणे करीत आहे.