PCMC News – मार्च २०२२ पासून महापालिकेत प्रशासकराज होते. महापालिका निवडणूक झाली अन तब्बच चार वर्षांनी महापालिकेची सर्वसाधारण सभा झाली. या निमित्ताने पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणे महापालिका भवनमध्ये चैतन्य बघायाला मिळाले. नगरसेवकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत, फोटोसेशन आणि कार्यकर्त्यांची वर्दळ हे चित्र महापालिका भवनात दिसत होते. महापालिकेतील लोकप्रतिनिधींची मुदत १२ मार्च २०२२ रोजी संपल्यानंतर सभागृह बरखास्त झाले होते. त्यानंतर महापालिकेचा कारभार प्रशासकीय पद्धतीने आयुक्तांच्या नियंत्रणाखाली सुरू होता. अखेर महापालिका निवडणूक पार पडली आणि १६ जानेवारीला निकाल लागला. भाजपला ८४ जागांसह स्पष्ट बहुमत मिळाले. त्यानंतर शुक्रवारी महापौर, उपमहापौर निवडीबरोबर पालिकेतील प्रशासकीय कार्यकाल संपून लोकनियुक्त कारभार सुरू झाला.महापौर निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी भाजप, विरोधी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे नगरसेवक पहिल्यांदा सभागृहात आले. नगरसेवकांनी प्रवेशव्दारावर डोके ठेवत आत प्रवेश केला. पहिल्यांदाच सभागृहात येत असलेल्या नगरसेवकांचे पालिका अधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका कर्मचाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. जे पुन्हा सभागृहात आले, ते एकमेकांना भेटून हस्तांदोलन करीत होते. भेटी-गाठी घेत होते. तर, पहिल्यांदा नगरसेवक झालेले आणि सभागृहात आलेल्या नगरसेवकांचेही जुने नगरसेवक स्वागत करत होते. त्यांना शुभेच्छा देत होते. महापालिकेच्या प्रवेशव्दारावरील पायऱ्यांवर, सभागृहात, तसेच महापालिकेच्या आवारात नगरसेवक, नगरसेविका फोटोसेशन, सेल्फी काढत होते. तर, महापौर, उपमहापौर यांच्या कार्यकर्त्यांनी, तसेच पहिल्यांदा जे नगरसेवक निवडून आले. त्यांच्या कार्यकर्त्यांची मोठी वर्दळ पालिकेत पाहायला मिळाली. तिसरा मजला कारभाऱ्यांनी सजला महापालिका भवनातील तिसरा मजला म्हणजे राजकीय कारभाऱ्यांचा मजला समजला जातो. या मजल्यावर महापौरांसह स्थायी समिती अध्यक्ष, पक्षनेता, विरोधी पक्षनेता, गटनेते आणि विषय समिती सभापतींची दालने आहेत. या दालनांत सातत्याने वर्दळ असते. मात्र, प्रशासक काळात हा मजला ओस पडला होता. महापौर, उपमहापौर, पक्षनेता आणि विरोधी पक्षनेता निवडीबरोबरच हा मजलाही गजबजला.