PCMC News – दिव्यांग बांधवांच्या स्वावलंबनासाठी महापालिकेने मोठ्या अपेक्षेने खरेदी केलेली तीनचाकी ई-वाहने सध्या वापराअभावी दिव्यांग भवनाच्या पार्किंगमध्ये धूळखात पडून असल्याचे चित्र आहे. गेल्या दोन महिन्यांपासून ही २५ ई-वाहने वाटपाच्या प्रतीक्षेत असून, अद्याप एकाही लाभार्थ्याला त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळालेला नाही. त्यामुळे चांगल्या उद्देशाने राबवलेला उपक्रम प्रशासकीय प्रक्रियेत अडकला असल्याची टीका होत आहे.दिव्यांग व्यक्तींना दैनंदिन प्रवास सुलभ व्हावा, रोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि स्वावलंबन वाढावे, या हेतूने महापालिकेने ही आधुनिक ई-वाहने खरेदी केली होती. ‘पर्पल जल्लोष’ या कार्यक्रमात वाहनांचे वितरण होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, आरटीओमधील तांत्रिक अडचणी आणि नोंदणी प्रक्रियेतील विलंबामुळे हा उपक्रम रखडला आहे.सध्या ही सर्व वाहने दिव्यांग भवनाच्या पार्किंगमध्ये उभी आहेत. अनेक वाहनांवर धूळ साचली आहे. काही वाहनांची चाके पंक्चर झाल्याचेही निदर्शनास आले आहे. पिंपरी चिंचवड महापालिका लाखो रुपये खर्चून खरेदी केलेली वाहने अशा अवस्थेत पडून राहणे ही गंभीर बाब असल्याची प्रतिक्रिया दिव्यांग बांधव आणि संघटनांकडून व्यक्त होत आहे.या ई-वाहनांमुळे दिव्यांग नागरिकांना शिक्षण, नोकरी, व्यवसाय तसेच वैद्यकीय उपचारांसाठीची ये-जा सुलभ होऊ शकते. मात्र, प्रशासकीय दिरंगाईमुळे लाभार्थ्यांना प्रत्यक्ष मदत मिळण्यास विलंब होत आहे. महापालिकेने आरटीओशी समन्वय साधून तांत्रिक अडचणी तातडीने दूर कराव्यात आणि रखडलेले वाहन वाटप लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. “दिव्यांग बांधवांसाठी खरेदी करण्यात आलेल्या २५ तीनचाकी ई-वाहनांची नोंदणी प्रक्रिया पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयात सुरू आहे. काही वाहनांची नोंदणी पूर्ण झाली असून, उर्वरित प्रक्रिया येत्या १५ दिवसांत पूर्ण करून दिव्यांग बांधवांना वाहनांचे वाटप करण्यात येईल.” – निवेदिता घार्गे, सहायक आयुक्त, दिव्यांग कक्ष