प्रभात वृत्तसेवा पिंपरी – महापालिकेच्या मुख्यालय इमारतीसह इतर कार्यालयात सुरक्षेच्या दृष्टीने कर्मचारी व अधिकाऱ्यांना ओळखपत्राशिवाय प्रवेश देण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच महापालिकेच्या सर्वच कार्यालयामध्ये प्रवेश करताना नागरिकांना गेट पास देऊन आणि गेटवरील ये-जा रजिस्टरला नोंदी घेवून आवश्यक त्या बाबींची तपासणी केल्यानंतरच नागरिकांना देखील प्रवेशद्वारातून प्रवेश देण्याची दक्षता घ्यावी, असे आदेश सामान्य प्रशासन विभागाकडून मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्यालयात व मनपाच्या इतर कार्यालयात प्रवेश करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्या ओळखपत्राची यापुढे सुरक्षेच्या दृष्टीने तपासणी होणार आहे. तसेच प्रवाशी व लोकाभिमुख प्रशासन व्यवस्थेसाठी प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन शिस्तीचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहणार आहे. महापालिकेचे आठ क्षेत्रीय कार्यालय व इतर विभागांमध्ये सुमारे ८ हजार कर्मचारी काम करत आहेत. महापालिकेच्या विविध विभागास सामान्य प्रशासनाने अचानक भेट देऊन तपासणी करण्यासाठी तपासणी पथकाची स्थापना केली आहे. त्यामुळे जागेवर उपस्थित नसलेल्या, काम सोडून बाहेर फिरत असलेल्या, उशिराने येणार्या अशा बेशिस्त कर्मचार्यांवर हे पथक कारवाई करत आहे. त्यानुसार महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या तपासणी पथकाने सुरक्षा विभागामार्फत महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर नियुक्त केलेले सुरक्षारक्षक हे अधिकारी व कर्मचारी यांना कार्यालयात ओळखपत्राशिवाय प्रवेश देत असल्याची बाब तपासणी पथकाच्या निर्दशनास आली आहे.महापालिकेच्या मुख्य इमारतीत व मनपाच्या इतर कार्यालयात कामानिमित्त येणारे नागरिक, आस्थापनेवरील काम करणारे अधिकारी, कर्मचारी व मानधन, ठेकेदार आदी कर्मचारी हे महापालिका कार्यालयात कामानिमित्त ये-जा करत असतात. नागरिकांना गेट पास देऊन आणि अधिकारी व कर्मचारी यांना ओळखपत्र परिधान करुन त्यांना मुख्यालयात प्रवेश देण्याबाबतचे काम सुरक्षारक्षकाकडून नियमितपणे व काटेकोरपणे होणे आवश्यक आहे. तसेच महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ओळखपत्राशिवाय महापालिका मुख्यालयात प्रवेश बंद करण्यात आला आहे. विविध कामांसाठी मुख्यालयात येणाऱ्या अभ्यागतांनादेखील मुख्यालयात गेटपास देण्यात येणार आहे. परंतु काही ठेकेदार आणि कंत्राटदार बनावट ओळखपत्राच्या माध्यमातून मुख्यालयात घुसखोरी करीत आहेत. यांना रोखणे महापालिका प्रशासनासमोर आव्हान असणार आहे. हेल्मेट नसणाऱ्यांना देखील बंदी दुचाकीस्वारांच्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. दुचाकीस्वारांना हेल्मेटची सवय लागावी यासाठी महापालिका मुख्यालयात दुचाकीने येणाऱ्या महापालिका कर्मचारी आणि नागरिकांना हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. हेल्मेट नसेल तर वाहनांना प्रवेश देण्यात येत नसून त्याचीदेखील अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात येत आहे. “महापालिकेच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सुरक्षा विभागास नियमानूसार तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. संबंधित विभागाकडून सर्व काटेकोर पालन करावे. कामकाज कसूर, हलगर्जीपणा, टाळाटाळ केल्याचे निर्देशनास आल्यास संबंधित सुरक्षारक्षक, पर्यवेक्षकीय कर्मचारी व विभागास जबाबदार धरुन शिस्तभंग विषयक कार्यवाही करण्यात येईल.” – मनोज लोणकर, सह आयुक्त, सामान्य प्रशासन विभाग, महानगरपालिका.