प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेने तयार केलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीत कर्मचार्यांकडून मोठ्या प्रमाणात चुका करण्यात आल्याने गोंधळ निर्माण झाला होत्या. त्यामुळे दहा हजारांपेक्षा अधिक हरकती दाखल झाल्या होत्या. त्या प्रकरणात एकही अधिकारी व कर्मचार्यांवर कारवाई करण्यात आली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. प्राप्त हरकतींचा योग्य प्रकारे निपटारा केल्याने कारवाई केली नाही, असे उत्तर महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर यांनी दिले आहे.पिंपरी, चिंचवड, भोसरी आणि भोर (ताथवडेचा भाग) या चार विधानसभा मतदारसंघाच्या १ जुलै २०२५ पर्यंत नोंद असलेल्या मतदार याद्या राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिकेस उपलब्ध करून देण्यात आल्या. त्या मतदार याद्या फोडून महापालिकेने १ ते ३२ प्रभागांच्या प्रारुप मतदार याद्या २० नोव्हेंबरला प्रसिद्ध केल्या. महापालिकेच्या कर्मचार्यांनी कामचुकारपणा केल्याने मतदार याद्यांत मोठ्या प्रमाणात घोळ निर्माण झाला. एका प्रभागातील मतदार यादीतील नावे दुसर्या प्रभागात जोडण्यात आल्या होत्या. माजी नगरसेवकांची नावेही दुसर्याच प्रभागात टाकण्यात आली होती. मतदार यादीतील त्रुटीच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून मतदार याद्यांची होळी करण्यात आली. महापालिका प्रशासनावर मोठ्या प्रमाणात टीकाही करण्यात आली.मतदार याद्यांतील चुकांमुळे तब्बल १० हजार २८८ हरकती दाखल झाल्या. त्यानंतर अधिकारी व कर्मचार्यांकडून हरकतींचा निपटारा करण्यात आला. अंतिम मतदार यादी २० डिसेंबरला प्रसिद्ध करण्यात आली. ती मतदार यादी विक्रीस उपलब्ध आहे. मतदार याद्यांतील चुकाबाबत संबंधित अधिकारी व कर्मचार्यांवर कारवाई न केल्याबद्दल आयुक्तांना विचारले असता ते म्हणाले की, प्राप्त हरकतींनुसार कार्यवाही करण्यात आली आहे. त्यामुळे दोषी कर्मचार्यांवर कारवाई करण्याचा प्रश्न निर्माण होत नाही, असे उत्तर दिले. या कृतीतून आयुक्तांनी दोषी कर्मचार्यांच्या चुकांवर पांघरुन घालण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे. “दुबार नावे असलेल्या मतदारांचा शोध घेऊन पडताळणी करण्यात आली आहे. मतदान केंद्रनिहाय मतदार यादी २७ डिसेंबरला प्रसिद्ध केली जाणार आहे. दुबार मतदारांचा शोध घेण्याची प्रक्रिया सातत्याने सुरू राहणार आहे. दुबार नावाच्या पुढे दोन स्टार असे चिन्हांकित केले जाणार आहे.” – श्रावण हर्डीकर, आयुक्त