प्रभात वृत्तसेवा पिंपरी – केशवनगर, चिंचवड परिसरातील काकडे टाऊनशिप वसाहतीसमोर गेल्या एक वर्षापासून अनधिकृतपणे घनकचरा, घाण, आरोग्यास घातक माती, राडारोडा राजरोसपणे टाकण्यात येत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिकेकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे ज्या टॅक्टरमधून हा राडारोडा टाकला जातोय त्यावर पुढील बाजूस नंबरही नाही.काकडे टाऊनशिप परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असून अनेक रहिवाशांचे आरोग्य बिघडल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत वारंवार महापालिकेकडे तक्रारी करूनही कोणतीही दखल न घेतल्याने, या गैरप्रकारात पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांचा आर्थिक सहभाग असावा, अशी शंका नागरिक व्यक्त करीत आहेत. संपूर्ण परिसर अक्षरशः डम्पिंग ग्राउंडमध्ये रूपांतरित झाला आहे.महावितरण समिती सदस्य मधुकर बच्चे यांच्यासह रहिवाशांनी घटनास्थळी भेट देत राडाराडा टाकणाऱ्या ट्रॅक्टर व डंपर चालकांना जाब विचारला. जर हा प्रकार असाच सुरू राहिला तर नागरिकांचा उद्रेक अटळ असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. येत्या चार ते पाच दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास सर्व रहिवाशांच्या वतीने अनोखे आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. संबंधित अधिकारी व आयुक्तांनी त्वरित दखल घेऊन दंडात्मक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.