प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण व्हावे, त्यांना चांगले घर मिळावे तसेच झोपडपट्टीविरहित शहर असावे, यासाठी केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या सहकार्यातून शहरातील प्रत्येक गरजू व बेघरांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका अग्रेसर आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतील डूडूळगाव येथील व आर्थिक दुर्बल घटकांच्या किवळे प्रकल्पांतील सदनिकांची संगणकीय सोडत सोमवारी (दि. १५) काढण्यात आली आहे.प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत डूडूळगाव येथे उभारलेल्या प्रकल्पातील १ हजार १९० सदनिका तसेच किवळे येथील आर्थिक दुर्बल घटकांच्या ७५५ सदनिकांचे पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृहात आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते संगणकीय सोडत झाली. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते सोडतीमध्ये विजेत्या सदनिका लाभार्थ्यांना प्रतिनिधिक स्वरूपात पत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त अण्णा बोदडे, सीओईपीचे विभागप्रमुख डॉ. सुधीर आगासे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी विजय बोरुडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी प्रास्ताविक केले. तर उपायुक्त अण्णा बोदडे यांनी योजनेबाबत सविस्तर माहिती दिली. “पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत डूडूळगाव येथील १ हजार १९० सदनिका तसेच किवळे येथील ७५५ सदनिकांच्या संगणकीय सोडतीमध्ये विजेते ठरलेल्या लाभार्थ्यांची यादी महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर नागरिकांना पाहण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे.” – अण्णा बोदडे, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका