प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात महापालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रभागनिहाय उमेदवारीचे नवे राजकारण आकार घेताना दिसत आहे. ज्या प्रभागातच वास्तव नाही, स्थानिक संपर्क मर्यादित आहेत, अशा ठिकाणांहून ‘इथूनच लढायचे’ असे स्पष्ट संकेत काही इच्छुकांना देण्यात येत असल्याची चर्चा चांगलीच रंगू लागली आहे.आगामी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर शहरातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. प्रभाग आरक्षण, पॅनलचे गणित आणि उमेदवारीचे आंतरिक व्यवहार यामुळे वातावरणात संभ्रम, कुजबुज आणि अस्वस्थता वाढली आहे. पारंपरिक ‘स्थानिक उमेदवार’ या निकषाला मागे टाकून काही प्रभागांत बाहेरच्या इच्छुकांना उतरण्याचे संकेत मिळत असल्याने शहरातील राजकारण अधिक रंगतदार बनले आहे.काही प्रभागांत स्थानिक पातळीवर जुनी कामे, मजबूत संपर्क व्यवस्था असलेले इच्छुक असतानाही दुसऱ्या प्रभागातील नेत्यांना उतरण्याची तयारी सुरू झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे “आमच्या प्रभागात बाहेरचा उमेदवार कशासाठी?” असा सवाल कार्यकर्त्यांतून उघडपणे विचारला जात आहे.महापालिकेच्या सत्तांतराच्या शक्यता, पक्षांतील गटबाजी आणि मोठ्या नेत्यांच्या जवळीकतेवर उमेदवारी ठरणार असल्याची भावना बळावत आहे. यामुळे अनेक इच्छुकांचे राजकीय भविष्य बंद दरवाज्यामागे निश्चित होत असल्याचा आरोपही कार्यकर्त्यांतून पुढे येत आहे. निवडणूक जवळ आल्याने सर्वच पक्षांत इच्छुकांची मोठी रांग लागली आहे. उमेदवारी न मिळाल्यास नाराजी उफाळून येईल आणि बंडखोरीची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती पक्षांत व्यक्त होत आहे. काही इच्छुकांनी तर आरक्षणाच्या जोरावर स्वतःचा मूळ प्रभाग सोडून दुसऱ्याच प्रभागात जाऊन प्रचारयंत्रणा उभी केली आहे.अधिकृत तिकीट वाटप अद्याप गुलदस्त्यात असतानाही शहरातील विविध प्रभागांत प्रचाराचे फलक, कार्यालये आणि सोशल मीडियावरील मोहीमा सुरू झाल्या आहेत. अनधिकृत आश्वासनांवर काहींचा प्रचार सुरू असल्याची कुजबुज असून प्रत्यक्ष उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अनेक समीकरणे पालटण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.पक्षीय निर्णय जाहीर होण्यात होणारा विलंब, बाहेरच्या प्रभागातील उमेदवारांचा वाढलेला प्रभाव आणि स्थानिक इच्छुकांना मिळणारी दुय्यम वागणूक या साऱ्यामुळे शहरात अंतर्गत बंडखोरीची ठिणगी पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.