प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी–चिंचवड महापालिका निवडणूक घोषित झाल्यानंतर आपल्यालाच उमेदवार मिळणार, असे गृहित धरून सर्वच पक्षातील इच्छुकांनी घरोघरी प्रचार करण्यास सुरूवात केली आहे. एकीकडे शहरात थंडी कायम असताना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात प्रचाराचे तापमान वाढत आहे. घरोघरी पोहोचणाऱ्या प्रचारपत्रकांचा अक्षरशः वर्षाव सुरू आहे. दररोज नवे उमेदवार, नवी आश्वासने आणि नवी पत्रके मतदारांच्या हातात पडत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम तर वाढतोच आहे, पण ‘प्रचारपेक्षा कागदाचाच पाऊस जास्त’ अशी कुजबुज सुरू झाली आहे.आगामी महापालिका निवडणुकीचा रंग चढू लागल्याने शहरातील प्रभागांत राजकीय हालचालींना वेग आला आहे. अनेक इच्छुक उमेदवारांकडून नागरिकांच्या घरोघरी प्रचारपत्रके वाटपाची रणधुमाळी सुरू झाली आहे. काही भागांत दररोज तीन ते चार पत्रके घरासमोर सापडत असल्याचे चित्र दिसत आहे. स्त्री उमेदवारांसह कार्यकर्त्यांच्या पथकांकडून सोसायट्या, चाळी आणि घराघरांत जाऊन वैयक्तिक भेटी व पत्रकवाटप करण्यात येत आहे. त्यामुळे “प्रचार जास्त की पत्रकांचा प्रचार जास्त?” असा टोला मतदारवर्गातून लगावला जात आहे.या पत्रकांच्या माध्यमातून अनेक नवी चेहरे समोर येत आहेत. प्रत्यक्षात कधीही न दिसलेले आणि स्वतःला कार्यसम्राट म्हणवून घेणारे काही इच्छुक उमेदवार किमान कागदावरील छायाचित्र आणि आश्वासनांच्या माध्यमातून तरी मतदारांपर्यंत पोहोचू लागले आहेत. त्यामुळे संभाव्य उमेदवारांची संख्या वाढताना दिसत असली, तरी मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे.प्रचार साहित्याच्या वाढत्या वापरामुळे स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाचाही प्रश्न गंभीर बनू लागला आहे. रस्त्यांवर, सोसायट्यांमध्ये उडणारी पत्रके आणि फाडलेले पोस्टर यामुळे शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत आहेत.नागरिकांचे म्हणणे आहे की, “फक्त पत्रकांवर आश्वासने देण्यापेक्षा थेट संवाद, बैठका आणि कामांचा ठोस अहवाल द्या.” काही मतदारांचा कल प्रत्यक्ष भेट, समस्या ऐकून घेणे आणि कामाचा हिशोब मांडणाऱ्या उमेदवारांकडे झुकताना दिसत आहे. आगामी काही दिवसांत प्रचाराची दिशा कशी बदलेल, नियमांचे पालन होईल का आणि कागदी प्रचारावर मर्यादा आणल्या जातील का, याकडे पिंपरी–चिंचवडकरांचे लक्ष लागले आहे. उमेदवाराने कोणतेही पत्रक वाटण्यापूर्वी निवडणूक आयोगाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र इच्छुकांना असे कोणतेही बंधन नाही. अर्ज भरल्यानंतरच उमेदवाराच्या खर्चाला हिशोबात पकडण्यास सुरूवात होते. प्रचारासाठी विद्यार्थ्यांचाही वापर सध्या शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नाताळच्या सुट्ट्या लागल्या आहेत. त्यामुळे पत्रक वाटण्यासाठी काही उमेदवारांकडून लहान मुलांचा वापर होत आहे. दरवाजाला कडीला पत्रक अडकविण्याच्या सूचना कार्यकत्र्यांकडून दिल्या जात आहे. मात्र यावर निवडणूक आयोगाचे कोणतेही नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे.