प्रभात वृत्तसेवा पिंपरी – मतदानाच्या दिवशी संपुर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे सर्व मतदान केंद्रे वेब कास्टिंगद्वारे जोडण्यात आली आहेत. तसेच संपुर्ण प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवून तात्काळ समन्वय करण्यासाठी नियंत्रण कक्ष उभारण्यात आला असून समन्वयासाठी समन्वय अधिकारी नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान प्रक्रिया मुक्त, निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका यंत्रणा सज्ज असून मतदारांनी आपला संविधानिक हक्क बजावण्यासाठी उत्स्फुर्तपणे मतदान करून इतर पात्र मतदारांना मताधिकार बजावण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी केले आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर वैद्यकीय सुविधा देण्यासाठी डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच पिण्याचे पाणी, व्हिलचेअर व्यवस्था, प्रतिक्षा कक्ष तसेच प्रथमोपचार पेटीसह इतर सुविधा देण्यात येणार आहे. भयमुक्त व निकोप वातावरणात मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असून नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार शिवाय विविध पथकांद्वारे देखील पोलीस यंत्रणा बारकाईने लक्ष ठेवून आहे. पोलीस बंदोबस्तासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध असून त्याद्वारे विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. मतदान केंद्र तसेच इतर ठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने दक्षता घेण्यात आली आहे.