प्रभात वृत्तसेवा पिंपरी – महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १६ मध्ये रावेत म्हस्के वस्ती, श्रीराम चौक, रावेत प्राधिकरण, गुरुद्वारा, किवळे व मामुर्डी या वेगाने विकसित होत असलेल्या भागांत गेल्या काही वर्षांत मुख्य व अंतर्गत रस्त्यांचे भक्कम आणि विस्तीर्ण जाळे उभे राहिले आहे. या रस्ते विकासामुळे वाहतूककोंडी कमी झाली आहे. हा विकास राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मोरेश्वर भोंडवे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शक्य झाल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे. यावेळी त्यांच्या नेतृत्वाखाली जयश्री भोंडवे, आशा भोंडवे, श्रेया तरस गायकवाड निवडणुकीसाठी रिंगणात आहेत.पूर्वी रावेत, किवळे व मामुर्डी परिसरात अपुरे रस्ते, अरुंद मार्ग, खड्डे आणि वाढती वाहतूक यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. मात्र नियोजनबद्ध पद्धतीने राबवलेल्या रस्ते विकास प्रकल्पांमुळे आज या भागात उत्तम कनेक्टिव्हिटी निर्माण झाली आहे. विशेषतः रावेत बीआरटी रस्ता ते म्हस्के वस्ती रस्ता तसेच मुकाई चौक ते रावेत चौक बीआरटी रस्त्यामुळे वाहतूक कोंडी कमी झाली असून सकाळ-संध्याकाळच्या गर्दीतून मोठा दिलासा मिळाला आहे. आकुर्डी रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वे क्रॉसिंग ओलांडणे धोकादायक बनले होते. या पार्श्वभूमीवर आकुर्डी रेल्वे स्टेशन लगत नवीन सबवे तसेच बिजलीनगर सबवेची निर्मिती करण्यात आली. सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे रेल्वे प्रशासन व महापालिकेकडून या महत्त्वाच्या प्रकल्पांना मान्यता मिळाली. सुरक्षित, सोयीस्कर पादचारी मार्ग उपलब्ध झाल्याने अपघातांचे प्रमाण कमी झाले असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.